सायकल कारागिराची मुलगी कृषी उपसंचालक, हर्षदा देसलेचे मेहनतीच्या बळावर यश

शिंदखेडा (प्रतिनिधी)-शिंदखेड्यासारख्या ग्रामीण भागात राहूनही कुटुंबात कसलेही शैक्षणिक वातावरण नसतानाही गरिबी आणि शैक्षणिक असुविधांशी दोन हात करत तिने आकाशभरारी घेतली. मेहनत आणि अभ्यास करत राहिली आणि आज ती कृषी विभागाची उपसंचालक झाली. तिच्या भरारीबद्दल तिच्यावर गावासह परिसरातील नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. मुलीचे हे यश पाहून तिच्या आई-वडिलांना तर आभाळच ठेंगणे झाले. हर्षदा सुनील देसले असे या मुलीचे नाव आहे.

हर्षदाचे मूळ गाव तसे शिंदखेडा तालुक्यातील माळीच. तिचे वडील सुनील राजधर देसले यांचे शिंदखेड्यात सायकल दुरुस्तीचे दुकान आहे. अशा परिस्थितीत आर्थिक परिस्थितीशी झगडत हर्षदाने चौथीपर्यंत किसान हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. पाचवी ते दहावी गर्ल्स हायस्कूलमध्ये, अकरावीचे एमएचएसएस महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्यानंतर धुळे येथे कृषी विद्यालयात बी. एस्सी केले. राहुरी विद्यापीठात एमएस्सी पूर्ण करून त्यात सुवर्णपदकही मिळविले. एम.एस्सी. नंतर बँकेची परीक्षा देऊन कॅनरा बँकेमध्ये दहा महिन्यांपासून कृषी अधिकारी म्हणून सेवेत होती. या काळातच तिने एमपीएससी परीक्षा देऊन ती उत्तीर्ण झाली आणि आज तिची निवड कृषी विभागाच्या उपसंचालकपदी झाली. तिच्या या भरारीने ग्रामीण भागातील मुलींसमोर आदर्श निर्माण झाला आहे.