जळगाव, दि.२५ – येथून जवळच असलेल्या विदगाव तापी पुलाजवळ कोळन्हावी येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह मिळून आला आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह मिळून आल्याने त्यांचा घातपात झाला असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
कोळन्हावी येथील अरूण सुकलाल साळुंखे वय-४५ हे वाहन चालक आहे. कोणाच्याही वाहनावर चालक म्हणून ते मिळेल तसे काम करतात. गेल्या पंधरा दिवसात त्यांचा गावातीलच काही लोकांसोबत वाद झाला होता. दि.२३ रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले असता पुन्हा घरी परतलेच नाही. सायंकाळी ते न आल्याने त्यांच्या कुटूंबियांनी शोधाशोध सुरू केली.
विदगाव पुलाजवळ आढळला मृतदेह
विदगाव पुलाजवळ गेल्या दोन दिवसापासून चेहर्यावर शर्ट टाकलेल्या अवस्थेत एक इसम पडून होता. शनिवारी सकाळी काही लोकांना संशय आल्याने त्यांनी शर्ट बाजूला करून पाहिला असता तो व्यक्ती मृत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिसरातील काही नागरिकांनी त्यांची ओळख पटवली.
खून केल्याचा संशय
मयत अरूण साळुंखे यांच्या शरीरावर जखमा आढळून आल्या असून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात आणण्यात आला. दरम्यान, साळुंखे यांचा काही दिवसापूर्वीच गावातील काही व्यक्तींसोबत वाद झाला होता. त्यामुळे त्यांचा घातपात झाला असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे