घाऱ्या निळ्या माऊ ,चला प्रदर्शनात पाहू. 

मुंबई -लहानपणी आपल्याला खाऊ भरवताना आणि आपले लाड पुरवताना आपली आई आपल्याला काऊ चिऊ च्या गोष्टी जशी सांगायची तशी सोबतीला माऊ ची गोष्ट देखील असायची . आणि खरं तर काऊ चिऊ पेक्षाही त्या लहान वयापासून आपल्या प्रत्येकाला घाऱ्या निळ्या डोळ्यांच्या ,झुबकेदार मिशा असलेल्या ,पांढऱ्या शुभ्र किंवा गडद काळ्याभोर मांजराचं प्रचंड आकर्षण राहिलेले आहे . दिसायला गोंडस असणारी आणि पटकन कुणालाही लळा लावणारी हि मांजर म्हणूनच अनेकांच्या घरात एक पाळीव प्राण्यांपेक्षा आपल्या कुटुंबातीलच एक सदस्य असतात . आपल्या देशाप्रमाणेच जगभरातील अनेक देशांमध्ये मांजरप्रेमींची संख्या हि प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे . अर्थात पाळीव प्राणी म्हणून गणना झालेल्या याच जगभरातील मांजरांच्या असंख्य जाती आणि स्वभाव धर्म देखील वेगवेगळ्या पद्धतीचे असतात . जगभरातील अशाच विविध जातीच्या मांजरांचे प्रदर्शन एकाच छताखाली भरणार आहे . फिलाईन क्लब ऑफ इंडिया [FCI] या संस्थेच्या वतीने येत्या ११ जून २०२३ रोजी नवी मुंबई वाशी येथील सिडको भवन येथे या कॅट शो चे आयॊजन करण्यात आले आहे . २०१९ मध्ये संपन्न झालेल्या पहिल्या आणि २०२२ मधील दुसऱ्या शो नंतर मागील रेकॉर्ड मोडत आशियातील सर्वात मोठा कॅट शो बनल्यानंतर यंदाचे या कॅट शो चे हे तिसरे वर्ष आहे .

”या कॅट शो मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचे परीक्षक मांजरीचे परीक्षण करणार असून काही प्रसिद्ध अभिनेते देखील परीक्षणार्थी म्हणून यात सहभाग घेणार आहेत . पाळीव प्राणीप्रेमींना या शो मध्ये पर्शियन ,बंगाल ,क्लासिक लॉन्ग ,हेअर ,एक्झॉटिक ,शॉर्ट हेअर ,मेनकुन इत्यादी विविध जातीच्या ५०० हुन अधिक मांजरी पाहण्याची संधी मिळणार आहे . FCI ने भारतीय भटक्या मांजरांना INDIMAU म्हणून ओळख देण्यासाठी आणि या जातीच्या मांजरांची नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत . आणि या कॅट शो मध्ये या भटक्या मांजरांचा देखील समावेश करण्यासाठी संस्था प्रत्नशील आहे . ” असे FCI चे अध्यक्ष श्री . साकिब पठाण म्हणाले .

या कॅट शो मध्ये लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असावा यासाठीच विविध उपक्रम ,मुलांसाठी फन झोन ,मांजरीबद्दल माहिती देणारे नॉलेज झोन ,इत्यादी कार्यक्रमांचे दिवसभर आयोचजण करण्यात येणार आहे . विशेष म्हणजे प्रदर्शनाला भेट देणारे मांजर प्रेमी तिथे उपस्थित एनजीओ कडून मांजर दत्तक देखील घेऊ शकणार आहेत . ५००० चौ . मीटर च्या प्रदर्शन हॉल मध्ये प्रमुख पाळीव प्राण्याशी संबंधित कंपन्यांचे ५० हुन अधिक स्टॉल असतील जसे मांजरांचे खाद्यपदार्थ ,उपकरणे आणि सेवा विशेष सवलती आणि अभ्यागतांसाठी ऑफर सह सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत हा कॅट शो सुरु असणार आहे . जगभरातील मांजरप्रेमींसाठी हा कॅट शो एका अर्थाने आनंदाची पर्वणीच असणार आहे .