हौदात पडुन पाच वर्षीय बालकाचा मृत्यू – वरणगांवातील घटना

विजय वाघ ।वरणगांव

सांयकाळी जेवण झाल्यानंतर घराबाहेर निघालेला मुलगा अर्धा तासानंतरही घरात न आल्याने आई वडीलांनी त्याचा शोध सुरु केला. मात्र, त्यांच्या जिवाचे काळीज असलेला कर्णव घराजवळच्याच पाण्याच्या हौदात सापडल्याची हृदयदायक घटना वरणगांवातील सरस्वती नगर भागात मंगळवारी सांयकाळी घडली. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे .

 

बोहर्डी ता. भुसावळ येथील एका खासगी शैक्षणिक संस्थेत ११ वर्षापासून शिपाई पदावर कार्यरत असलेले हेमेंद्र बडगुजर ( मुळ रा . दोंडाईचा ) ह.मु. वरणगांव हे सरस्वती नगर भागात आपली दोन मुले व पत्नीसह रहीवासाला असुन नुकतेच त्यांनी आपल्या घराचे बांधकाम केले. अशा या परिवाराचा संसाराचा रहाट गाडा सुख समाधानाने सुरु असतानांच मंगळवारी सांयकाळी ७ वाजेदरम्यान परिवारातील सदस्यांनी जेवण केल्यानंतर हेमेंद्र बडगुजर यांचा पाच वर्षीय लहान मुलगा कर्णव हा लगतच्याच मित्रांसोबत खेळण्यासाठी घराबाहेर निघाला . मात्र, अर्धा तासांची वेळ होवुनही कर्णव घरी न आल्याने आई – वडील व भावाने त्याचा परिसरात शोध घेतला. मात्र, तो आढळून न आल्याने शेजारील रहीवाशीही त्यांच्या मदतीला धावून आले व त्यांनीही शोधाशोध सुरू केली असता बडगुजर यांच्या घराबाहेरच जमिनीत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या हौदात शोध घेण्यात आला. आणि होत्याचे नव्हते झाले कर्णव हा पाण्याच्या हौदात आढळून आल्याने त्याला तातडीने बाहेर काढून खासगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र, कर्णवच्या भावी जिवनाची (आयुष्याची ) दोरी कापल्या गेली होती. या घटनेने बडगुजर परिवारासह समाजमन सुन्न झाले असुन बुधवारी कर्णववर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले . कर्णव हा शहरातीलच सरदार वल्लभभाई पटेल इंग्लीश मिडीयम स्कूल मध्ये सिनीयर केजी मध्ये शिक्षण घेत होता.

पाणी टंचाईच्या समस्येने केला घात

शहरात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात बिकट झाली असून नगर परिषदेकडुन दहा ते बारा दिवसानंतर पाणी पुरवठा केला जातो. यामुळे नागरीकांना पुरेपुर पाण्याची साठवणूक करावी लागत असल्याने हेमेंद्र बडगुजर यांनी घराचे बांधकाम करतानांच घरासमोरच जमिनीत लहानशा जागेत ६ बाय ६ व पाच फुट खोल आकाराचा पाण्याचा हौद बांधून घेतला. तसेच त्यावर लहानसे झाकणासाठी जागा ठेवली आहे. मात्र, याच हौदाने न भुतो न भविष्यती असा कर्णवचा घात केल्याने अनेकांच्या मुखी क्लेशदायक हळहळ व्यक्त केली जात आहे .