सीआरपीएफच्या वाहनाने धडक दिलेल्या युवकाचा मृत्यू

0

श्रीनगर – आंदोलन करणाऱ्या युवकाला केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) वाहनाने धडक दिल्याने गंभीररित्या जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी प्रार्थनेनंतर झालेल्या आंदोलनादरम्यान जमावात अडकलेल्या जीपखाली आल्याने युवक गंभीर जखमी झाला होता. येथील शेर-ए-काश्मीर वैद्यकीय संस्थेत उपचार घेत असताना युवकाचा मृत्यू झाला.

३ युवक जखमी

जुन्या शहरातील नोवाहट्टा परिसरात शुक्रवारी प्रार्थनेनंतर झालेल्या आंदोलनात आतापर्यंत ३ युवक जखमी झाले आहेत. आंदोलनादरम्यान युवकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पेलेट बंदुकांचाही वापर केला. दरम्यान नोवाहट्टातील ऐतिहासिक जामिया मशिदीच्या व्यवस्थापनाने मशिदीच्या गेटवर स्वयंसेवकांना तैनात करत विरोध करणाऱ्या युवकांना प्रवेश करण्यास प्रतिबंध केल्याबाबतच्या वृत्तांचे खंडन केले आहे. मागील शुक्रवारीदेखील दगडफेक करून मशिदीमध्ये घुसणाऱ्या युवकावर सुरक्षा दलांनी अश्रुधुरांचा आणि पेलेट बंदुकांचा वापर केला होता.