वर्सोवा – विरार सागरी सेतूच्या व्यवहार्यता अभ्यास अहवालाचे स्वतंत्र सल्लागारामार्फत समवयस्क पुनरावलोकन करण्याचा निर्णय
मुंबई | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वर्सोवा – विरार सागरी सेतूच्या व्यवहार्यता अभ्यास अहवालाचे स्वतंत्र सल्लागारामार्फत समवयस्क पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतला आहे. सल्लागाराच्या नियुक्तीसाठी नुकत्याच आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा जारी करण्यात आल्या आहेत. या सागरी सेतूला जोडणाऱ्या विरार – पालघर नियंत्रित मार्गिकेची व्यवहार्यताही याच समवयस्क पुनरावलोकनाअंतर्गत तपासण्यात येणार आहे. यासंबंधीचा अहवाल आल्यानंतर देशातील सर्वाधिक लांबीच्या आणि महागड्या अशा सागरी सेतूचा सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्याचेही पुनरावलोकन आंतरराष्ट्रीय स्तरावरील सल्लागारामार्फत करण्यात येणार आहे.
मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी, तसेच मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी ४२.७५ किमी लांबीच्या वर्सोवा – विरार सागरी मार्गाचे बांधकाम एमएमआरडीए करणार आहे. मुळात हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा होता. मात्र राज्य सरकारने आर्थिक अडचणींमुळे हा प्रकल्प ‘एमएमआरडीए’कडे सोपविला. दरम्यान, ‘एमएसआरडीसी’ने नियुक्त केलेल्या मे. पेंटॅकल-सेमोसा कंपनीने या प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास केला आहे. मात्र ही सल्लागार कंपनी राष्ट्रीय स्तरावर काम करणारी आहे. हा प्रकल्प सर्वात मोठा, तसेच सर्वाधिक महागडा असल्याने ‘एमएमआरडीए’ने आंतरराष्ट्रीय सल्लागाराच्या माध्यमातून व्यवहार्यता अभ्यास अहवालाचे समवयस्क पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. दरम्यान, पेंटॅकल-सेमोसा कंपनी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करणार आहे. या आराखड्याचे समवयस्क पुनरावलोकन करण्यात येणार आहे. या दोन्ही कामांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सल्लागाराची नियुक्ती करण्याकरीता निविदा जारी करण्यात आल्याचेही श्रीनिवास यांनी सांगितले.