48 बंदीजनांसह 117 दृष्टिबाधितांना मुक्तची पदवी

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात दीड लाख विद्यार्थ्यांना पदवीदान  

नाशिक| प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे आयोजित 28 व्या दीक्षांत सोहळ्यात एक लाख 55 हजार 234 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यात सर्वाधिक विद्यार्थी नाशिकसह पुणे व अमरावती विभागातील आहे. ज्येष्ठ नागरीकांसह दृष्टीबाधित, कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या 48 बंदीजनांनाही पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तर विविध विद्याशाखांमधील 9 विद्यार्थ्यांनाही सुवर्ण पदक व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

पदवी प्रदान सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. इंद्रमणी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील होते. कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. जयदीप निकम, आदी उपस्थित होते.
नवे शैक्षणिक धोरण 2020 ची बीजे खुल्या आणि दूरस्थ शिक्षण प्रणालीत दडलेली आहेत. स्वयंअध्ययन साहित्य ही कोणत्याही मुक्त विद्यापीठाची खरी ताकद आणि कणा आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बाबतीतही हे खरे आहे, यात शंका नाही, असे प्रतिपादन कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. इंद्रमणी यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 28 व्या दीक्षांत समारंभाच्या दीक्षांत भाषणात विद्यार्थ्यांना संबोधताना ते बोलत होते. शिक्षणाची गुणवत्ता, अनुदान, अभ्यासक्रम आणि मूल्यमापन, टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन, एज्युकेशनल गव्हर्नन्स अँड मॅनेजमेंट, शिक्षक भरती आणि धारणा, समावेश आणि विविधता, जागतिकीकरण व टिकाऊपणा या आव्हानांबाबत सजग राहण्याचे आवाहन केले.

48 बंदीजनांनी मिळवली पदवी
एक लाख 55 हजार 234 पैकी अमरावती विभागीय केंद्राचे 24571, औरंगाबादचे 15470, मुंबईचे 10265, नागपूरचे 20526, पुणे 25390, कोल्हापूर 12056, नांदेड 22072 आणि नाशिक विभागीय केंद्राच्या 24884 विद्यार्थांचा समावेश आहे. यात एकूण एक लाख 693 विद्यार्थी व 54 हजार 541 विद्यार्थिनींचा समावेश आहेत. 60 वर्षांवरील 200 विद्यार्थ्यांचा यात समावेश होता. पदवी मिळवणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या 48 बंदीजनांचा समावेश होता. पदविकाधारकांमध्ये 24518, पदव्युत्तर पदविकाधारक 12, पदवीधारक 1 लाख 14 हजार 328, पदव्यूत्तर पदवीधारक 16369, पीएच.डी धारक 5 तर पदवीधारक विद्यार्थ्यांमध्ये 117 विद्यार्थी दृष्टीबाधित आहेत.