दिल्लीत ४०० पेट्रोल पंप चालकांचा बंद

0

नवी दिल्ली- दिल्लीत इंधनाच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी तब्बल ४०० पेट्रोल पंप आणि सीएनजी पंप चालकांनी बंद पुकारला आहे. दिल्लीतील केजरीवाल सरकारने इंधनावरील व्हॅट कमी करण्यास नकार दिल्याने त्याविरोधात दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशने (डीपीडीए) विरोध दर्शवला आहे. दरम्यान, हा संप भाजपापुरस्कृत संप असल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

दिल्लीत सुमारे ४०० पेट्रोल पंप असे आहेत ज्यामध्ये सीएनजी स्टेशनही जोडलेले आहेत. हे सर्व पंप दिल्ली सरकारच्या व्हॅट कमी न करण्याच्या निर्णयाविरोधात सोमवारी २४ तासांसाठी बंद राहतील. हे सर्व पंप २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेपासून उद्या २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहतील. दरम्यान, लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

केंद्र सरकारने ४ सप्टेंबर रोजी पेट्रोल-डीझेलवरील उत्पादन शुल्कासह २.५० रुपये प्रति लिटर दरकपात केली होती. त्यानंतर शेजारील राज्ये हरयाणा, उत्तर प्रदेशसह विविध राज्यांनी आपल्या व्हॅटमध्ये (मुल्यवर्धीत कर) तेवढीच कपात करीत जनतेला ५ रुपयांचा दिलासा दिला होता. मात्र, दिल्ली सरकारने पेट्रोल-डीझेलवर व्हॅट कपात करण्यास नकार दिला. त्यामुळे दिल्लीत शेजारील राज्यांच्या तुलनेत इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत असे डीपीडीएचे अध्यक्ष निश्चल सिंघानिया यांनी सांगितले.