माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन; दिल्लीत दोन दिवसीय दुखवटा जाहीर !

0

नवी दिल्ली: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन झाल्याने दिल्लीत दोन दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे दिल्लीत कोणताही सरकारी कार्यक्रम होणार असून भाजपनेही आज आणि उद्या होणारे पक्षाचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. दीक्षित यांच्या निधनावर सर्व पक्षांकडून शोक व्यक्त होत आहे.

शीला दीक्षित या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने फोर्टीस एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फोर्टीस एस्कॉर्ट रुग्णालयाचे चेअरमन आणि डॉ. अशोक सेठ यांच्या नेतृत्वाखालील पथक त्यांच्यावर उपचार करत होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत तात्पूरती सुधारणाही झाली होती. मात्र त्यांना पुन्हा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.

शीला दीक्षित यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ १५ वर्ष काम पाहिले. त्या १९९८ पासून ते २०१३ पर्यंत दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली तीन वेळा काँग्रेसने दिल्लीत सत्ता स्थापन केली. ३१ मार्च १९३८ मध्ये पंजाबच्या कपूरथलामध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी दिल्लीच्या कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी स्कूलमधून शिक्षण घेतलं. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून मास्टर्स ऑफ आर्ट्समध्ये पदवी घेतली. त्यांनी १९८४ ते १९८९ पर्यंत उत्तर प्रदेशातील कन्नौजच्या खासदार म्हणूनही काम पाहिलं. दिल्लीचा चेहरामोहरा बदलण्याचं सर्व श्रेय दीक्षित यांना जातं. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी दिल्लीचा विकास केला. केरळच्या राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. त्यांनी संयुक्त राष्ट्र आयोगात ५ वर्ष भारताचं प्रतिनिधीत्व करून महिलांच्या समस्येकडे संयुक्त राष्ट्राचं लक्ष वेधलं. सध्या दिल्ली काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे होती.