‘आप’सरकारला दणका; राष्ट्रीय हरित लवादाकडून २५ कोटींचा दंड

0

नवी दिल्ली-दिल्लीतील प्रदूषण रोखण्यात ‘आम आदमी पक्षाची सरकार अपयशी ठरल्याने राष्ट्रीय हरित लवादाने दिल्ली सरकारला २५ कोटींचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम सरकार भरू शकले नाही तर अधिकाऱ्यांच्या पगारातून दरमहा १० कोटी रुपये कापले जाऊन ही वसुली केली जाईल असेही लवादाकडून सांगण्यात आले आहे. तसेच जे लोक प्रदूषणाला जबाबदार आहे त्यांनाही दंड ठोठावला जावा असेही कोर्टाने सांगितले आहे.

मात्र राष्ट्रीय हरित लवादाने असे म्हटले आहे की जर केजरीवाल सरकार हा दंड भरण्यात अपयशी ठरले तर त्यांच्याकडून दरमहा १० कोटी रुपये वसूल केले जातील. प्रदूषणाशी संबंधित सहापेक्षा जास्त याचिकांवर दिल्लीतील कोर्टात सुनावणी झाली त्यानंतर हा दंड ठोठावण्यात आला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने प्रदूषणासंदर्भात घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचेही कोर्टाने म्हटले आहे.

दिल्लीतील रोहिणी भागात असलेल्या २०० पेक्षा जास्त कार वर्कशॉपना त्यांनी वर्कशॉप बंद करावे असे आदेश देण्यात आले होते. मात्र ते बंद झाले नाहीत. अनेक वर्कशॉप बेकायदेशीर रित्या सुरुच असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. दिल्लीतील प्रदुषणाच्या मुद्द्यावरून सध्या सुप्रीम कोर्टानेही कठोर भूमिका घेतली आहे. त्यातच आता राष्ट्रीय हरित लवादानेही केजरीवाल सरकार प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरल्याचे सांगत त्यांना २५ कोटींचा दंड ठोठावला आहे.