नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयाने युपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावाई रॉबर्ट वढेरा व त्यांचे निकटवर्तीय मनोच अरोरा यांना आज सोमवारी नोटीस पाठवली आहे. ही नोटीस ईडीच्या याचिकेवरून पाठवण्यात आली आहे. त्यांना ट्रायल कोर्टाद्वारे त्यांना देण्यात आलेला अटकपूर्व जामीनाला आव्हान देण्यात आलेले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ जुलै रोजी होणार आहे. न्यायाधीश चंद्र शेखर यांच्या समोर ही सुनावणी पार पडली. ईडीने शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी रॉबर्ट वढेरा यांना मंजूर झालेला अटकपूर्व जामीन रद्द करण्यात यावा, अशी विनंती ईडीने उच्च न्यायालयाला केली होती. वढेरा यांना अटकेपासून संरक्षण दिल्याने तपासात अडथळे येऊ शकतात, असे ईडीच्या वकिलांनी याचिकेत म्हटले होते. वढेरा यांना १ एप्रिल रोजी कनिष्ठ न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.
ईडीने याचिकेत हे देखील म्हटले होते की, या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी आरोपींना ताब्यात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे वढेरा व अरोरा यांना मिळालेला जामीन रद्द केला जावा. १ एप्रिल रोजी कनिष्ठ न्यायालयाने या दोघांना प्रत्येकी पाच लाख रूपयांचा दंड आकारात जामीन मंजूर केला होता. तसेच, न्यायालयाने वढेरांना ईडीच्या चौकशीत सहकार्य करण्याचे आदेशही दिले होते. शिवाय न्यायालयाच्या आदेशाशिवाय वढेरांना परदेशात न जाण्याचेही आदेश दिले होते.