नवी दिल्ली: लोकशाहीत कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ठेवण्याचे कार्य पोलीस आणि न्याय व्यवस्थेला करावे लागते. या दोन्ही यंत्रणेशिवाय देशात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहूच शकत नाही. मात्र गेल्या दोन दिवसांपासून राजधानी दिल्लीत पोलीस विरुद्ध वकील संघर्ष पेटला आहे. तीस हजारी कोर्टात पोलीस आणि वकिलांमध्ये हाणामारी झाली. याचे आता दिल्लीत गंभीर पडसाद उमटत आहे. आज दिल्लीत चक्क पोलिसांनीच आंदोलन केले आहे. दिल्लीतील एकही पोलीस कामावर हजर झालेला नसून सर्व पोलीस रस्त्यावर उतरले आहे. पोलिसांकडून न्यायाची मागणी होत आहे.
दिल्ली पोलिस रस्त्यावर उतरले असून जोरदार घोषणाबाजी करत आहेत. माजी पोलीस अधिकारी किरण बेदी यांचे फोटो घेऊन पोलीस आंदोलन करत आहेत. किरण बेदी यांच्या सारख्या पोलीस आयुक्तांची दिल्लीला गरज असल्याची घोषणाबाजी दिल्ली पोलीस करत आहे.