दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीतील प्रदुषणाने उच्चांक गाठला असून, प्रदूषणाचा मुद्दा गाजत आहे. दिल्लीतील प्रदुषणाला आपल्या शेजारील असणारे पाकिस्तान, चीन जबाबदार असल्याचा जावईशोध भाजपा नेते विनीत अग्रवाल यांनी लावला आहे. आपल्या देशाला घाबरणाऱ्या शेजारील राष्ट्राने विषारी वायू सोडला असावा, त्यामुळे दिल्लीतील हवा प्रदूषित झाली असावी, असं विधान त्यांनी केले आहे.
दिवाळीनंतर दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. वायू प्रदूषणामुळे दृश्यमानता कमी झाल्याने दिल्लीतील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. प्रदुषणामुळे वाहतूकीवरही परिणाम झाला आहे. दिल्लीतील प्रदूषणाचा मुद्दा अतिशय गंभीर होत असताना भाजप नेत्याने यासाठी थेट पाकिस्तान आणि चीनला जबाबदार धरलंय. पाकिस्तानचा शेवट जवळ आला आहे. भीकेचा कटोरा घेऊन पाक जगभर फिरतोय. याच पार्श्वभूमीवर भारताचं नुकसान व्हावं यासाठी पाक प्रयत्न करतोय, असं अग्रवाल यांचं म्हणणं आहे. खाजगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अग्रवाल यांनी विधान केले आहे.
विनीत अग्रवाल हे भाजपच्या उत्तर प्रदेश व्यापार विभागाचे संयोजक आहेत. त्यांनी याआधीही अशी खळबळजनक विधानं केली आहेत. ‘सध्या जवळपास अर्ध्या देशात विषारी वायू पसरला आहे. शेतकरी तर या आधीही तण जाळत होते. पण त्यावेळी इतकं प्रदूषण होत नव्हतं. यावर चिंतन करण्याची गरज आहे. यामागे पाकिस्तानचा हात असू शकतो. पाकिस्तान असा देश आहे की जो मुघलांवरही मात करत आहे. स्वत:ला नष्ट करण्याच्या मार्गावर ते राष्ट्र आहे. त्यामुळे आपण सावध राहायला हवं’, असं अग्रवाल यांनी म्हटलं आहे.