दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून परत घेण्याच्या रिझव्र्ह बँकेच्या निर्णयावरून आजी-माजी केंद्रीय वित्तमंत्र्यांमध्ये देशाच्या आर्थिक राजधानीत शाब्दिक चकमक झडली. दोन हजाराची नोट चलनात आणणे तेव्हाची गरज होती. गरज पूर्ण झाल्यानंतर रिझव्र्ह बँके नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे सांगत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला. तर नोटा चलनात आणणे आणि मागे घेण्याचा निर्णय मूर्खपणाचा असून त्यामुळे भारतीय चलनाच्या स्थैर्याविषयी शंका निर्माण होते, अशी टीका माजी वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी केली. यावर वित्तमंत्री राहिलेल्या व्यक्तीने जबाबदारीने बोलले पाहिजे, असे प्रत्युत्तर सीतारामन यांनी दिले.
मुंबई : दोन हजाराची नोट परत मागविण्याचा निर्णय अविचारी, किंबहुना मूर्खपणाचा असल्याची टीका माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी केली. केंद्राकडे वाढत्या बेरोजगारीवर व महागाईवर मात करण्याचे कोणतेही धोरण नाही. श्रीमंत-गरीब यांच्यातील दरी रुंदावत असल्याची टीकाही त्यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केली. नऊ वर्षांत मोदी सरकार सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
सामान्य जनतेची गरज नसताना दोन हजार रुपयाच्या नोटा चलनात आणण्यात आल्या. या नोटा मागे घेण्याच्या तमाशाने भारताच्या चलनाच्या अखंडतेवर व स्थैर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे, असा आरोप चिदम्बरम यांनी केला. मुळात दोन हजार रुपयाच्या ५० टक्के नोटा बाहेर आल्याच नाहीत. आता या नोटा चलनातून मागे घेण्याच्या समर्थनार्थ नोटांचे आयुष्य पाच वर्षांचे असते, असा दावा केला जात आहे. ५० व १०० रुपयांच्या नोटा अनेक वर्षांपासून चलनात आहेत, त्याचे काय, असा सवालही त्यांनी केला. एक हजार रुपयाच्या नोटा पुन्हा चलनात आणल्या तर आश्चर्य वाटायला नको, असेही ते म्हणाले.
सुरक्षेच्या मुद्दय़ावर टीका
विरोधी पक्षांनी मागणी करूनही देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नावर संसदेत चर्चा केली जात नाही, असा आरोप चिदम्बरम यांनी केला. चिनी सैन्याने भारताच्या ताब्यातील भूभागात अतिक्रमण केले आहे आणि आजही ते त्यांच्या ताब्यात आहेत, त्याचे भरपूर पुरावे आहेत. चीन सीमाभागात संरक्षण पायाभूत सुविधा वाढवत आहे, तसेच सीमेवर नवीन वसाहती उभारत आहे, असा दावा करून मणिपूरमधील परिस्थितीवरही चिदम्बरम यांनी चिंता व्यक्त केली. मोदी सरकारच्या कालखंडात सामाजिक कलह, सांप्रदायिक संघर्ष, असहिष्णुता, द्वेष, भीती याने दररोज आपले जीवन बिघडवत असल्याची टीका त्यांनी केली.
– पी. चिदम्बरम, माजी केंद्रीय वित्तमंत्री
जबाबदारीने बोला : सीतारामन
मुंबई : दोन हजाराची नोट मागे घेण्याचा निर्णय हा रिझव्र्ह बँकेच्या अखत्यारीतील आहे. वित्त मंत्रालयामध्ये अनेक वर्षे असलेल्या व्यक्तीने जबाबदारीने बोलणे गरजेचे आहे, असे प्रत्युत्तर केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी चिदम्बरम यांना दिले. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसूत्रीनुसार गेली नऊ वर्षे काम करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशातील गोरगरीब व शोषित-वंचित घटकाला विकासाच्या प्रवाहात आणल्याचा दावाही त्यांनी केला. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
दोन हजार रुपयाची नोट चलनात आणणे ही काळाची गरज होती. ती पूर्ण झाल्यावर नोटा ३० सप्टेंबपर्यंत बँकेत जमा करण्याची सूचना रिझव्र्ह बँकेने केली आहे. रिझव्र्ह बँकेच्या प्रसिद्धीपत्रकात सर्व बाबी स्पष्ट असताना एवढय़ा महत्त्वाच्या व गंभीर विषयात हेतूविषयी शंका उत्पन्न करणे चुकीचे असल्याचे सीतारामन म्हणाल्या. चिदम्बरम यांच्या कार्यकाळात अनेक मुद्दय़ांवर संसदेत व अन्यत्रही विरोधकांनी आक्षेप घेतले असताना त्यांनी कधी समाधानकारक उत्तरही दिले नव्हते, असा आरोपही त्यांनी केला.