नोटाबंदीनंतर २४ हजार कोटी बँकेत जमा

0

नवी दिल्ली-नोटाबंदीनंतर सुमारे ७३ हजार नोंदणी रद्द झालेल्या कंपन्यांनी बँक खात्यात २४ हजार कोटी जमा केले आहेत. सरकारकडूनच ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. काळा पैसा आणि बेकायदा संपत्ती प्रतिबंध कायद्यांतर्गत कंपनी प्रकरणांच्या मंत्रालयाने सुमारे २.२६ लाख कंपन्या बंद केल्या होत्या. या कंपन्या दीर्घ काळापासून कोणताही व्यवसाय करत नव्हत्या. यातील बहुतांश कंपन्या या काळ्या पैशांच्या व्यवहारासाठी सुरू करण्यात आल्याचा संशय आहे.

६८ कंपन्या चौकशीच्या कक्षेत

मंत्रालयाने एकत्रित आकडेवारीनुसार, २.२६ लाख नोंदणी रद्द केलेल्या कंपन्यांपैकी १.६८ लाख कंपन्यांच्या बँक खात्यावर नोटाबंदीनंतर पैसे जमा करण्यात आले. यामध्ये ७३ हजार कंपन्यांनी २४ हजार कोटी रूपये जमा केले आहेत. विविध बँकांकडून कंपन्यांची माहिती जमा केली जात आहे. मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या दस्तऐवजानुसार ६८ कंपन्या चौकशीच्या कक्षेत आहेत. कंपनी कायद्यानुसार सरकारला नोंदणीकृत कंपन्या वेगवेगळ्या कारणांमुळे बंद करण्याचा अधिकार आहे.

मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, सीरियस फ्रॉड इन्वेस्टिगेशन ऑफिसकडून (एसएफआयओ) १९ कंपन्यांचा तपास केला जात आहे. रजिस्ट्रार ऑफ कंपनीजच्या (आरओसी) तपासकक्षेत ४९ कंपन्या आहेत. नोव्हेंबर २०१६ मध्ये सरकारने ५०० आणि १००० रूपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या. काळ्या पैशाविरोधात सरकारचे हे महत्वाचे पाऊल असल्याचे मानले जात होते.