आदिवासी वसतीगृहे व शिष्यवृत्ती बंद करण्याच्या निर्णयाविरोधात निदर्शने

0

ठाणे : आदिवासी वसतीगृहे व शिष्यवृत्ती बंद करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचा निषेध करीत स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

आदिवासी वसतिगृहातील ६१०७० या विद्यार्थी क्षमते पैकी २०५३५ विद्यार्थी कमी करून भाडेतत्वावरील असंख्य वसतीगृहे बंद करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय, आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या नियमात केलेला अन्यायकारक बदल यांचा निषेध करण्यासाठी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या ठाणे पालघर जिल्हा समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाच्या निर्णयाचा निषेध करीत निदर्शने केली. जिल्हा अध्यक्ष विलास भुयाल, सचिव कविता वरे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. वस्तीगृहातील विद्यार्थी या आंदोलनात सामील झाले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

वसतिगृहातील विद्यार्थी संख्या २० हजारने वाढविण्याचे व ५० नवीन शासकीय वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. या वाढीव २० हजार विद्यार्थ्याना पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेत सामावून त्यांना वसतिगृहात प्रवेश देण्याऐवजी त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. यामुळे वसतीगृह व्यवस्था मोडीत निघणार आहे व मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्याचे कविता वरे यांनी सांगितले.