रणगावात डेंग्यु सदृष्य परिस्थिती – एका विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यु

( ग्रामीण रुग्णालय व नगर परिषदेने तातडीने उपाय योजनांची आवश्यकता )

विजय वाघ ।वरणगांव
शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यु सदृष्य आजाराची रुग्ण संख्या वाढत असून एका १२ वर्षीय विद्यार्थ्याचा डेंग्यु सदृष्य आजाराने संशयास्पद मृत्यु झाल्याने शहरामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे . यामुळे ग्रामीण रुग्णालय तसेच नगर परिषदेने तातडीने उपाय योजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक झाले आहे .

शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यु सदृष्य आजाराची लक्षणे आढळुन येत असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असुन ऑगष्ट महिन्यात हि संख्या मोठ्या प्रमाणात होती . तर डेंग्यु सदृष्य आजाराची लक्षणे आढळुन आलेल्या रुग्णांनी भुसावळातील खाजगी रुग्णालयातील उपचाराला प्राधान्य दिल्याने बहुतांश रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली . मात्र अशाच प्रकारे शहरातील जुने पोस्ट गल्लीतील आपल्या आजीकडे शिक्षणासाठी आलेला अणर्व विशाल कुळकर्णी ( रा . अंतुर्ली ता . मुक्ताईनगर, वय -१२ ) या विद्यार्थ्याला डेंग्यु सदृष्य आजाराची लागण होवुन त्याच्या शरीरातील प्लेट्स लेट्स कमी झाल्या होत्या . यामुळे काल अचानक त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला तातडीने भुसावळातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . मात्र, उपचार सुरु असतानांच त्याची प्राणज्योत मालवल्याने शहरातील जुने पोष्ट गल्लीसह अंतुर्ली गावात शोककळा पसरली असुन मयत विद्यार्थ्यावर अंतुर्ली येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले . मयत अणर्व हा आयुध निर्माणीतील केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेत होता . तर याच प्रकारे शहरातीलच महात्मा गांधी विद्यालयातील एका शिक्षकाच्या दोन्ही मुलांना देखील डेंग्युची लक्षणे आढळून आली होती . यामुळे त्यांनी तातडीने आपल्या पाल्यावर भुसावळातील खासगी रुग्णालयात उपचाराला प्राधान्य दिल्याने त्यांच्या दोन्ही पाल्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे . तर शहरात डेंग्यु सदृष्य आजाराची लक्षणे आढळून येत असल्याने शहरवासीयांमध्ये चिंतेचे सावट निर्माण झाले असून वरणगांव ग्रामीण रुग्णालयात डेंग्यु आजाराचे निदान करण्यासाठी आवश्यक किटच उपलब्ध नसल्याने संशयास्पद रुग्णांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत असल्याने शासनाच्या मोफत उपचाराच्या घोषणेचा या ठिकाणी बट्याबोळ झाल्याचे दिसून येत आहे . यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून नगर परिषद प्रशासनाने शहरातील कंटेनर सर्व्हेक्षण करून तातडीने उपाय योजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे . तसेच शहरातील डॉ पंकज पाटील यांनी त्यांच्याकडे डेंग्यु आजाराचा रुग्ण आढळून आल्याच्या बाबतीत नगर परिषद प्रशासनाला पत्रव्यवहाराद्वारे कळविण्यात आल्याचे सांगितले .

पाण्याची साठवणूक ठरतेय घातक
शहरात किमान १४ ते १५ दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक करावी लागत आहे . यामुळे डेंग्युच्या डासांना पोषक वातावरण निर्माण होत असल्याने नागरीकांच्या चिंतेत भर पडत असून डासांच्या अळ्याचे निर्मुलन करण्यासाठी पाण्याचा कोरडा दिवस पाळणे नागरीकांना अशक्य आहे . यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने डेंग्यूच्या डासांच्या निर्मुलनासाठी धुरळणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे . अन्यथा शहरवासीयांच्या भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही .

नागरीकांनी काळजी घ्यावी
शहरात ऑगष्ट महिन्यात डेंग्यु सदृष्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढली होती . आरोग्य प्रशासनाने याबाबतीत जनजागृती करणे गरजेचे असुन नागरीकांनीही डास व अळ्याच्या निर्मुलनासाठी घरातील कुलर व इतर ठिकाणी साचून असलेल्या पाण्याचा नायनाट करावा . तसेच संरक्षणासाठी शरीरावर पूर्णपणे कपडे परिधान करणे आवश्यक आहे .
डॉ राहुल भोईटे ( भोईटे रुग्णालय वरणगांव )

डॉ . क्षितीजा हेंडवे
( वैद्यकिय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय वरणगांव )