असमानतेच्या वागणुकीमुळे ट्रान्सजेंडर व्यक्तींमध्ये नैराश्य ‘ट्रान्सजेंडर आणि आरोग्य’ विषयावरील व्याख्यानमालेत डॉ. राधेश्याम चौधरी यांचे मत
जळगाव | (प्रतिनिधी) | समाजात असमानतेची वागणूक मिळत असल्याने ट्रान्सजेंडर व्यक्तींमध्ये नैराश्य येवून त्यांना मानसिक आरोग्याच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत असल्याचे मत सुप्रसिध्द स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.राधेश्याम चौधरी यांनी व्यक्त केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळा आणि नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ सोशल डिफेन्स, मिनीस्ट्री ऑफ सोशल जस्टीस अॅण्ड एम्पावरमेंट, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ट्रान्सजेंडर’ विषयावरील तीन दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेत ‘ट्रान्सजेंडर आणि आरोग्य’ या विषयावर त्यांनी दुसरे पुष्प गुंफले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संगमनेर येथील सामाजिक कार्यकत्र्या अॅड. निशा शिवूरकर, माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.सुधीर भटकर, डॉ.गोपी सोरडे, डॉ. सोमनाथ वडनेरे, डॉ.रोहित कसबे, नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ सोशल डिफेन्स, मिनीस्ट्री ऑफ सोशल जस्टीस अॅण्ड एम्पावरमेंटचे संचालक डॉ.आर.गिरीराज, सल्लागार संजय पवार, श्वेता सेहगल, सात्विक शर्मा आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना डॉ.चौधरी म्हणाले की, अन्न, वस्त्र, निवारा त्याबरोबरच आरोग्य देखील मानवाची मूलभूत गरज आहे. ट्रान्सजेंडर व्यक्तीही सामान्य लोकांप्रमाणेच आहेत. मात्र त्यांच्या आरोग्याच्या समस्या अधिक प्रमाणात असल्याचे नमूद करत, त्यांच्यात लैगिंक समस्या पाच पटीने तर आत्महत्येचे प्रमाण ४० % पेक्षा अधिक असून त्यांच्यात कॅन्सर सारखे आजार बळावत असल्याचे डॉ.चौधरी यांनी निदर्शेनास आणून दिले. ट्रान्सजेंडर व्यक्तींना समाज, कुटुंब नाकारत असल्याने, सन्मानाने जगता येत नसल्याने तसेच रोजगार मिळत नसल्याने भयावह अशा मानसिक आजारांनाही सामोरे जावे लागत असल्याचे डॉ.चौधरी यांनी स्पष्ट केले. आरोग्य संरक्षण, सामाजिक सुरक्षा कायद्याने ट्रान्सजेंडर व्यक्तींना दिली आहे. त्यामुळे ट्रान्सजेंडर व्यक्तीला हे अधिकार देणारा भारत देश जगात अव्वल ठरला असून संविधानाचे रक्षण करणे आणि समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक असल्याची भूमिका देखील त्यांनी यावेळी मांडली. संविधानिक मूल्ये जोपासून संविधान आणि संस्कृतीची सांगड घालणे आवश्यक असल्याचेही डॉ.चौधरी म्हणाले. त्यानंतर डॉ.चौधरी यांनी सहभागींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
सामाजिक बहिष्कारामुळे ट्रान्सजेंडर व्यक्तीच्या अस्तित्वाला धोका : अॅड.निशा शिवूरकर
सामाजिक बहिष्कारामुळे ट्रान्सजेंडर व्यक्तीच्या अस्तित्वाला धोका पोहचतो आणि त्यातून त्यांच्या वाट्याला नकारात्मकता येत असल्याचे मत संगमनेर येथील सामाजिक कार्यकत्र्या अॅड.निशा शिवूरकर यांनी ‘ट्रान्सजेंडर आणि सामाजिक दृष्टीकोन’ या विषयावर बोलतांना व्यक्त केले. दुर्लक्षित घटकांना संविधानाने जगण्याचा अधिकार दिला असतांनाही, ट्रान्सजेंडर व्यक्तींविरूध्द चुकीच्या पध्दतीने समाज माध्यमांतून विद्वेष पसरविला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ‘माणसा माणसा कधी व्हशील माणूस’ या कवितेचा दाखला देत, माणूस म्हणून प्रत्येकांना जगण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजातल्या सर्व समाज घटकांना संरक्षण देण्याची जबाबदारी संविधानाची असल्याने ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या कल्याणकारी योजना राबविण्यासाठी कायदे करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रास्ताविक माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.सुधीर भटकर यांनी केले. मान्यवरांचा परिचय डॉ.गोपी सोरडे, डॉ.रोहित कसबे यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ.सोमनाथ वडनेरे यांनी केले. यशस्वितेसाठी सौ.रंजना चौधरी, प्रकाश सपकाळे, सिध्दार्थ बत्तीसे, प्रल्हाद लोहार यांनी परिश्रम घेतले.
शुक्रवारी दोन विषयांवर व्याख्यान
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळा आणि नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ सोशल डिफेन्स, मिनीस्ट्री ऑफ सोशल जस्टीस अॅण्ड एम्पावरमेंट, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेतील पुढील पुष्प शुक्रवार दि.३१ रोजी सकाळी ११ वाजता ‘ट्रान्सजेंडर आणि माध्यमांचा दृष्टीकोन’ या विषयावर दै.देशदूतचे संपादक हेमंत अलोने तर ‘ट्रान्सजेंडर आणि मानवी हक्क’ या विषयावर शिक्षणशास्त्र प्रशाळेच्या प्रमुख प्रा.डॉ.मनिषा इंदाणी गुंफतील. व्याख्यानमालेत सहभागी होण्यासाठी http://tiny.cc/Zoom_MCJझूम लिंकवर 9423490044 आयडी व 123 हा पासवर्ड वापरुन लॉगइन करता येईल.