नवी दिल्ली: भारतातील अनेक ऐतिहासिक वस्तू परदेशी राज्यकर्त्यांनी चोरून नेल्या आहेत. १०० वर्षांपूर्वीची अन्नपूर्णा देवीची मूर्ती भारतातून चोरून कॅनडामध्ये नेण्यात आली होती. ही मूर्ती पुन्हा भारतात येत असल्याची खुश खबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून दिली. संपूर्ण भारतीयांसाठी ही गर्वाची गोष्ट आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
देवी अन्नपूर्णाची एक खूपच जुनी मूर्ती कॅनडातून भारतात परत येत आहे. ही मूर्ती सुमारे १०० वर्षांपूर्वी १९१३ रोजी वाराणसीतील एका मंदिरातून चोरून देशाबाहेर नेण्यात आली होती. भारत आणि कॅनडा सरकारमधील हे कार्य यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे आभार मानतो असेही मोदींनी यावेळी सांगितले.
“देवी अन्नपूर्णाच्या मूर्तीचा काशी शहराशी खूपच खास संबंध आहे. आता देवीची मूर्ती परत भारतात येणं आपल्या सर्वांसाठी सुखद आहे. देवी अन्नपूर्णाच्या मूर्तीसह आपल्या परंपरेतील अनेक अनमोल ठेवा आंतरराष्ट्रीय टोळ्यांचे शिकार झाला आहे. या टोळ्या आंतरराष्ट्रीय बाजारात या मूर्ती मोठ्या किंमतीत विकतात. आता यावर भारताकडून दावा करण्यात येत आहे. या मूर्ती भारतात आणण्यासाठी भारताने आपले प्रयत्न देखील वाढवण्यात आले आहेत. या प्रयत्नांमुळेच गेल्या काही वर्षात भारत अनेक मूर्ती आणि कलाकृती पुन्हा देशात आणण्यास यशस्वी ठरला आहे”, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.