सेलू: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे. अनेक मराठा तरुणांनी या मागणीसाठी आत्महत्या देखील केल्या आहेत दरम्यान धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनाच्या बैठकीची तयारी सुरू असतानाच तालुक्यातील गोेमेवाकडी येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा, या मागणीसाठी १३ आॅगस्टपासून समाजबांधवांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यातच गोमेवाकडी येथील योगेश राधाकिशन कारके (२०) या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले असून, पंचनामा सुरू केला आहे. योगेश याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाईलवरून बी. शिंदे यांच्या मोबाईल क्रमांकावर टेक्स मॅसेज लिहिला होता. त्यात धनगर आरक्षणासाठी मी जीव देत आहे, असे म्हटले आहे. मात्र रेंजच्या कारणावरून हा मॅसेज सेंट झाला नसावा, अशी माहिती बीट जमादार चवरे यांनी दिली.