बीड: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची क्लिप व्हायरल होत आहे. यावरून पंकजा मुंडे यांचे समर्थक आक्रमक झाले. त्यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान याबाबत धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केला आहे. यावेळी धनंजय मुंडे माझ्यावर तथ्यहीन आरोप होत असल्याचे सांगत भावूक झालेत.
मला निवडणुकीत मिळत असलेल्या प्रतिसाद विरोधकांना खुपत असून मला संपविण्यासाठीच केवळ बहिण-भावाच्या नात्यात विष कालविण्याचे काम केले जात असल्याचा पलटवार धनंजय मुंडे यांनी केला आहे.
काही मानलेले भाऊ माझ्या विरोधात षडयंत्र रचत असून जनताच याला उत्तर देईल असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला. बदनामीच करायची होती, तर कोणत्याही पद्धतीने केली असती. मला काही वाटले नसते, परंतु बहिण-भावाच्या नात्याला डाग लागेल अशा पद्धतीने प्रयत्न केला जातो आहे.