धनंजय मुंडेंना ब्राझील भेटीचे निमंत्रण

शिष्टमंडळाची मुंबईत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा

मुंबई – राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची ब्राझील सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुंबईत भेट घेतली. या भेटीत कृषी, कृषी व्यापार व गुंतवणुकीसह आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. याचवेळी ब्राझीलच्या शिष्टमंडळाने धनंजय मुंडेंना ब्राझील भेटीचे निमंत्रण दिले.

कमी पावसात जास्तीत जास्त उत्पादन देणारे सोयाबीन, वातावरण बदलावर आणि शेतीमध्ये केलेले प्रयोग, तसेच शेतीसंदर्भातील संशोधन, कमी पाण्यात उसाचे अधिकाधिक उत्पादन करणे, याबरोबरच बेदाणेवरील आयात कर कमी करणे, तसेच ब्राझीलसोबत यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या बाबीबद्दल अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने कृषी विद्यापीठाच्या संशोधकांना ब्राझीलला पाठवण्याबाबत या वेळी चर्चा झाली.

याबरोबरच ब्राझीलच्या शिष्टमंडळाने धनंजय मुंडे यांनाही नोव्हेंबरमध्ये ब्राझीलला येण्याचे निमंत्रण दिले, तर या भेटीदरम्यान धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्रातील पारंपरिक शेती आणि त्यामध्ये होत असलेल्या नवनवीन प्रयोगांबाबत शिष्टमंडळाला माहिती दिली. तसेच राज्यातील कृषी क्षेत्रात असलेल्या गुंतवणुकीच्या संधींबाबतही सांगितले.

दरम्यान, ब्राझीलच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राच्या कृषिमंत्र्यांची भेट घेत चर्चा केल्यामुळे दोन्ही देशातील कृषी, कृषी व्यापार व गुंतवणुकीला फायदा होणार आहे. तसेच सोयाबीन, कापूस, ऊस यासह आदी महत्त्वाच्या संशोधन व व्यापारासंदर्भातही चर्चा या भेटीत झाली आहे.