जय मल्हार सेनेचे प्रदेशाध्यक्ष लहुजी शेवाळे यांची माहिती
जळगाव – राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण दिले आहे. राज्यातील धनगर समाजाला हेतुपुरस्सर या आरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. भाजपा सरकारने सत्तेवर येण्यापुर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेवर आल्यानंतर भाजपाने हे आश्वासन न पाळल्याने धनगर समाज यावेळी निवडणुकित भाजपाविरोधात मतदान करणार असल्याची माहिती जय मल्हार सेनेचे प्रदेशाध्यक्ष लहुजी शेवाळे यांनी आज पत्रकार परीषदेत दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय मल्हार सेनेचे प्रदेशाध्यक्ष लहुजी साळवे आज जळगाव दौर्यावर आले होते. या दौर्यात शहरातील पत्रकार भवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष लहुजी साळवे पुढे म्हणाले की, सन २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेत्यांनी धनगर समाजाने आम्हाला मतदान केल्यास आम्ही त्यांना आरक्षण लागू करू असे आश्वासन दिले होते. धनगर समाजाने भाजपा नेत्यांच्या या आश्वासनावर विश्वास ठेऊन त्यांना भरघोस मतदान करून सत्तेत बसविले. मात्र सत्तेत आल्यानंतर भाजपा सरकारने दिलेले आश्वासन पुर्ण केले नाही. भाजपाने राज्यातील धनगर समाजाचा विश्वासघात केला असल्याचा आरोप शेवाळे यांनी केला. औरंगाबाद येथे धनगर समाजाचे नुकतेच राज्यस्तरीय पदाधिकार्यांची बैठक पार पडली. या बैठकीत यावेळेच्या निवडणुकीत आरक्षण नाही… तर मतदान नाही असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत धनगर समाज हा भाजपाच्या विरोधात मतदान करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष शेवाळे यांनी दिली. यावेळी प्रदेश सरचिटणीस विठ्ठल शिमगाडे, रंजना बोरसे, सुकलाल धनगर, संजय गढरी, आबा रावते, दीपक गढरी, भिमराज पवार, प्रकाश थोरात यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात दीड कोटी तर जिल्ह्यात पावणे दोन लाख मतदार
धनगर समाजाने घेतलेला निर्णय हा भाजपासाठी धोकेदायक ठरू शकतो. कारण राज्यात धनगर समाज हा दीड कोटीहून अधिक आहे. तर जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदारसंघात ९० हजार आणि रावेर मतदारसंघात ८० हजार असे एकुण १ लाख ७० हजार धनगर समाजाचे मतदान आहे. निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी झाल्यास या दोन्ही मतदारसंघात धनगर समाजाची मते निर्णायक ठरू शकतात अशी माहिती प्रदेश सरचिटणीस विठ्ठल शिमगाडे यांनी ‘दै. जनशक्ति’शी बोलतांना दिली.