मुंबई: विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरु होत असून त्या पार्श्वभूमीवर आज मुंबई येथील विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षाच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत धनंजय मुंडे यांनी गिरीश महाजन यांच्याकडील खाते काढून त्यांच्याकडे फोडाफोडीचे नवीन खाते द्यावे असा टोला लगावला. भाजप सरकारकडून विरोधी पक्षातील नेत्यांना पक्ष सोडण्याबाबत धमकावले जाते, तसेच आमिषे दाखवली जाते असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
भ्रष्ट मंत्र्यांना राज्यातील जनता वगळल्याशिवाय राहणार नाहीत. ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी येत्या अधिवेशनात मागणी लावून धरू असेही ते म्हणाले. अधिवेशनात दुष्काळ, बेरोजगारी या मुद्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. राज्याची आर्थी स्थिती बिकट असून राज्याची महसूल तुट हि ३५ हजार कोटींपर्यंत पोचली आहे. हे सरकार आभासी आहे अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.
राज्यात दुष्काळ असतांना आम्ही फिरलो. मात्र सरकार, मंत्री कुठेच फिरतांना दिसले नाहीत, मुख्यमंत्री यांनी एसी कॅबिनमध्ये बसून दुष्काळाचा आढावा घेत आहे. राज्यात भीषण दुष्काळ आहे, पेरणीसाठी 25 हजार रु मदत द्या, सरसकट कर्जमाफी , वीज बिल माफ करा अशा विविध मागण्यांसाठी विरोधक सदनात आक्रमक भूमिका घेणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितले. त्यामुळे उद्यापासून सुरु होणारं राज्यातील विधिमंडळ अधिवेशन सरकारसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचं चित्र पाहायला मिळणार आहे.