धरणगावकरांच्या ‘अमृत’ला 44 कोटींचा बुस्टर डोस

पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे महत्वाचे पाऊल 

धरणगाव, प्रतिनिधी – पाणी टंचाईची समस्या धरणगाव शहराच्या पाचवीला पुजली आहे. मात्र, या समस्येवर कायमस्वरूपी मात करण्याचा संकल्प पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला असून त्या दृष्टीने भक्कम पावले टाकली जात आहे. शहरात अमृत योजने अंतर्गत 27 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून आता या योजनेला 44 कोटींचा बुस्टर डोस पालकमंत्री गुलाबराव पाटील दिला आहे. दररोज पाणी पुरवठा करण्यासंदर्भात ना.पाटील यांचे नियोजन असून या अंतर्गत आणखी दुसरा बुस्टर डोस देण्याची त्यांची तयारी सुरू आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, धरणगाव शहरातील पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी अमृत योजनेंतर्गत २७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. या योजनेंतर्गत शहरातील पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिन्यांचे जाळे नव्याने टाकण्यात आले असून तीन नविन जलकुंभांची निर्मिती करण्यात आली आहे. सर्व जलवाहिन्या नव्याने टाकण्यात आल्या असून नळ जोडणी नव्याने देण्यात आली आहे. सध्या या पाणी पुरवठा योजनेची टेस्टींग सुरू आहे.

अंतर्गत पाणीपुरवठा योजना कार्यन्वीत झाली असली तरी तापी नदीवरील पंपिंग स्टेशन असलेल्या हावडा ते धरणगाव पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जिर्ण झाल्यामुळे अनेक ठिकाणी गळती सुरू असते. शिवाय पंपिंग स्टेशन आणि तेथील विद्यृत मोटारी यांच्याही अडचणी असल्यामुळे पाणी पुरवठा खंडीत होत असतो. हीच अडचण लक्षात घेवून गुलाबराव पाटील यांनी धावडा ते धरणगाव नवीन पाईपलाईन टाकणे व धावडा येथे अद्ययावत भव्य पम्पिंग स्टेशन उभारण्यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांना आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते.

पालकमंत्री गुलाबरावांच्या नंतर अमृत-2 च्या कामाचे तांत्रिक सादरीकरण नुकतेच मंत्रालयात करण्यात आले. 44 कोटींच्या या कामांना शासनाच्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या सदस्यांसमोर हे सादरीकरण करण्यात आले. कामाची निकड आणि मागणी लक्षात घेवून 44 कोटींच्या अमृत-2 योजनेला तांत्रिक मंजूरी देण्यात आली असून लवकरच काम सुरू करण्यासंदर्भात नियोजन केले जात असल्याचे ना.गुलाबराव पाटील यांनी सांगितले. पुढील टप्प्यात गुळ प्रकल्प ते हावडा डोहा पर्यत पाईपलाईन टाकून गुळ नदीचे पाणी थेट हावडा डोहात आणण्याचे नियोजन असल्याचेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. भविष्यात धरणगावात पाणी समस्येवर कायमस्वरूपी मात करण्यात येणार असल्याचेही ना.पाटील यांनी सांगितले.