नवी दिल्ली – सामना जिंकला तर सर्वजण जिंकणार आहोत आणि हरलो तरीही एकत्रच हरणार आहोत त्यामुळे यश व अपयश दोन्ही सर्वांचे एकत्र आहे. कुण्या एकाला दोष देणे योग्य नाही असे चैन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी म्हणतो. धोनी कधीही पराभवाचे खापर कोणत्या एका खेळाडूवर फोडत नाही आणि त्याचाबरोबर तो संघातील प्रत्येक खेळाडूवर विश्वास ठेवतो असे चेन्नईचा खेळाडू रविद्र जडेजा सांगतो.
सामन्याचा निकाल जो काही असेल त्याचा आपण सारे एकत्र मिळून सामना करायचा, असे धोनी सांगत असतो. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना कोणतेही दडपण जाणवत नसल्याचे जडेजाने सांगितले.
आयपीएलच्या या मोसमात चेन्नई सुपर किंगने ७ सामने जिंकत १४ गुण पटकावले आहेत. चेन्नई एक्सप्रेसच्या या विजयामागे महेंद्रसिंग धोनीचे श्रेय आहे. धोनीचे नेतृत्व सर्वच क्रिकेट प्रेमींना भुरळ घालत आले आहे. त्यामुळे धोनीच्या या नेतृत्वाच्या यशामागे नेमके काय गुपित आहे, हा प्रश्न नेहमीच उत्सुकतेचा ठरलेला असतो. आता धोनीच्या याच गुपिताचा खुलासा चेन्नईचा खेळाडू रवींद्र जडेजाने केला आहे.
धोनीने नेहमीच खेळाडूंना जपले आहे. तो प्रत्येक खेळाडूचा आदर करतो. त्यांच्यातील गुणवत्तेला न्याय देतो. सामन्यातील परिस्थिती पाहून आपण कशी कामगिरी करू शकतो, याबद्दलही तो योग्यवेळी मार्गदर्शन करतो. त्यामुळेच त्याच्या नेतृत्वाखाली आपल्याला खेळायला मिळावे, अशी बऱ्याच खेळाडूंची इच्छा असते, असेही जडेजा याने यावेळी सांगितले.