उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील लिपिक 50 हजार घेतांना जाळ्यात

0

धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ; परिचर पदाच्या आदेशाची प्रत देण्यासाठी मागितली लाच

जळगाव : धुळे येथील महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या तक्रारदाराला प्रयोशशाळा परिचर या पदाच्या मान्यतेच्या आदेशावर सहसंचालक यांची स्वाक्षरी घेऊन आदेशाची प्रत मिळविण्याच्या मोबदल्यात 50 हजार रूपयांची लाच घेताना येथील येथील सहसंचालक उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिक अतुल सहजे (49) रा. महाबळ कॉलनी परिसर याना शुक्रवारी दुपारी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कार्यालयात सापळा लावून पकडून ताब्यात घेतले. कारवाईनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात ट्रॅप झाल्याच्या अफवेेने खळबळ उडाली होती.

तक्रारदारही धुळ्याच्या महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक
तक्रारदार हे धुळे येथील महाविद्यालयात 15 मे 2010 पासून कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या पदास सह संचालक उच्च शिक्षण विभाग जळगाव यांनी मान्यता दिली नाही. त्यामुळे तक्रारदाराने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. नंतर दि. 10 जानेवारी 2019 रोजी खंडपीठाने निकाल देताना संस्थेकडे पद रिक्त आहे ते इतर मागास वर्गाचे पदावर समावेश करावे व या पदास सहसंचालक उच्च शिक्षण विभाग जळगाव यांनी पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता द्यावी, असे निर्देेश केले होते. तक्रारदाराने सहसंचालक कार्यालयात जाऊन वरिष्ठ लिपिक अतुल सहजे यांची भेट घेतली असता प्रयोगशाळा परिचर या पदाच्या मान्यता आदेशावर सहसंचालक यांची स्वाक्षरी घेऊन आदेशाची प्रत मिळवून देण्याच्या मोबदल्यात 50 हजाराची लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराने धुळे ‘एसीबी’कडे केली तक्रार
तक्रारदार यांनी या प्रकरणी लाच लुचपत विभाग धुळे यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी 14 मे 2019 रोजी केली असता वरिष्ठ लिपिक सहजे यांनी तक्रारदाराकडे 50 हजार रूपयांची लाचेची मागणी केली. त्यानुसार शुक्रवार दि. 05 जुलै रोजी दुपारी दोन वाजता जळगाव कार्यालयात एसीबी पथकाने पंचासमक्ष सापळा लावला असता 50 हजाराची लाच घेताना सहजे यांना रंगेहात पकडून ताब्यात घेतले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पथकाने केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने (नाशिक परिक्षेत्र) अपर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक सुनिल
कुराडे, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर व त्यांच्या पथकातील हेड कॉन्स्टेबल जयंत साळवे, पोलीस नाईक संतोष हिरे, संदीप सरग, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले, शरद काटके, कैलास जोहरे, प्रकाश सोनार, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, संदीप कदम, सुधीर मोरे यांनी केली.