पत्र्याच्या शेडवर झाड कोसळल्याने एकाच कुटुंबातील चार जण ठार; एक जखमी

0

धुळे : तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वाऱ्यासह झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीने धुळे तालुक्यातील वरखेडी शिवारातील एका शेतात पत्र्याचे शेडवर चिंचेचे झाड पडून एकाच कुटुंबातील चार जण ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. यात एक महिला तीन मुलांचा समावेश आहे.

तालुक्यातील वरखेडी गावाच्या शिवारात प्रभाकर दादू गुजर यांच्या शेतात दादूराम जामा पावरा ((32) रा.सापखडकी ता.पानसमेल जि.बडवाणी मध्यप्रदेश) हे सालदार असून ते शेतातील पत्र्याचे शेडमध्ये कुटुंबीयांसह राहतात. शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास अचानक वादळ वाऱ्यासह झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीने पत्र्याचे शेड जवळील चिंचेचे झाड शेडवर कोसळले. यात शेडमध्ये झोपलेले दादूराम पावरा जखमी झाले तर त्यांची पत्नी अनिताबाई पावरा (28), मुलगा वशिला पावरा (03), मुलगी पिंकी पावरा (02),रोशनी पावरा (01) असे चौघेजण दाबले गेल्याने जागीच ठार झाले. चौघांना मध्यरात्री जिल्हा रुग्णालयात मृतावस्थेत दाखल करण्यात आले, असून जखमी दादूराम पावरा यांच्यावर उपचार सूरु आहेत.