शिक्षकांच्या प्रयत्नांनीच डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारणार

1

रावेर- जिल्हा परीषद शाळांमधून डिजिटल शिक्षणाचे धडे गिरवले जात असून शिक्षकांच्या प्रयत्नांनीच ‘डिजिटल इंडिया’ चे स्वप्न साकारणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी येथे केले. शिक्षण विभाग पंचायत समिती रावेरच्या वतीने आयोजित बेस्ट डिजिटल स्कूल पुरस्कार समारंभात ते बोलत होते. स्वामी विवेकानंद शाळेच्या सभागृहात हा सोहळा झाला.

प्रमुख अतिथी म्हणून सभापती माधुरी नेमाडे, जिल्हा परीषद सदस्य आत्माराम कोळी, सुरेखा पाटील, नंदा पाटील, पंचायत समिती सदस्य जितेंद्र पाटील, दीपक पाटील, योगीता वानखेडे, कविता कोळी, धनश्री सावळे, गटविकास अधिकारी डॉ.सोनिया नाकाड, रामदेवबाबा संस्थाध्यक्ष रवींद्र पवार, गटशिक्षणाधिकारी विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी नवाज तडवी, रवींद्र सपकाळे, सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते. मराठी आणि उर्दू माध्यमांचे शैक्षणिक साहित्य दालनांची पाहणी मान्यवरांनी केली.

प्रत्येक मूल शिकले पाहिजे -पवार
प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी केले. ते म्हणाले की, प्रत्येक मूल शिकले पाहिजे यासाठी जिल्हा परीषद शाळा डिजिटल करण्यावर भर दिला आहे. एक दिवस केंद्रासाठी, टेक्नोटीचर क्लब , अध्ययन स्तर तपासणी मोहीम इत्यादी उपक्रम यासाठी राबविण्यात आले.

या शाळा ठरल्या बेस्ट डिजिटल
सूत्रसंचलन ज्योती राणे यांनी तर आभार केंद्रप्रमुख हरिश्चंद्र बोंडे यांनी मानले. भूषण चौधरी, शरद ढाके, केंद्र प्रमुख राजेंद्र सावखेडकर, पंचायत समिती सदस्या योगीता वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत ‘बेस्ट डिजिटल जिल्हा परीषद शाळा पुरस्कार‘ मिळालेल्या शाळा अशा- जिल्हा परीषद शाळा कळमोदा, कुंभारखेडा, मोरव्हाल, शिंदखेडा, तांदलवाडी, थोरगव्हाण, केर्‍हाळे बु.॥, अजनाड, रोझोदा, धूरखेडा, निंबोल, वाघाडी, उटखेडे, विवरे व गहुखेडा. याप्रसंगी पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना पारीतोषिक देऊन गौरवण्यात आले. यशस्वीतेसाठी दत्त एरीगेशन कंपनी फैजपूर, मुख्याध्यापक राजू पवार, केंद्रप्रमुख फिरोज तडवी, हारुन जमादार, दीपक मराठे, लीलाधर पाटील, अरुण संध्यान, प्रफुल्ल मानकर, सतीश बिचवे यांचे सहकार्य लाभले.