मुंबई- साताबाराचा उतारा शेतकऱ्यांच्या जीवनातील एक मोठी गोष्ट असते. कर्ज असो की सरकारी योजना प्रत्येक गोष्टीसाठी सातबाराचा उतारा आवश्यक असतो. पण तो देणारा तलाठी हा बऱ्याचदा शेतकऱ्यांना वेळेवर भेटत नाही त्यामुळे अनेकदा शेतकऱ्याला तलाठय़ाच्या मागे हेलपाटे मारावे लागतात. आता हे चित्र बदलणार असून तलाठ्याची संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा देण्यात येणार आहे. अशा प्रकारे उतारा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने डिजिटल सातबारा देण्याचे काम महसूल विभागाने सुरू केले. एक ऑगस्ट २०१८ पर्यंत राज्यातील सर्व अडीच कोटी सातबारा उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त होतील. महसूल विभागाच्या वतीने आयोजित डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उपक्रमाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.