अखेर दीपिका, रणवीरच्या लग्नाची तारीख ठरली !

0

नवी दिल्ली- रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे लग्न करणार असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. दोघ एकमेकांच्या रिलेशनमध्ये असल्याचे अनेक दिवसांपासून दिसून येते. अखेर दोघांच्या लग्नाची तारीख ठरली आहे. आज खुद्द दीपिका व रणवीर आपल्या लग्नाच्या तारखेची अधिकृत घोषणा केली. येत्या १४ व १५ नोव्हेंबरला दीपिका व रणवीर सिंग साता जन्माची गाठ बांधणार आहेत. ‘आमच्या कुटुंबाच्या आशीर्वादाने आमचे लग्न १४ व १५ नोव्हेंबर २०१८ रोजी होत आहे. आमच्या या सुंदर प्रवासासाठी आपल्या आशीर्वादाची कामना करतो,’असे दीपिका व रणवीरने सोशल मीडियावर केलेल्या लग्नाच्या घोषणेत म्हटले आहे.

https://www.instagram.com/p/BpMRx9CBO1S/?utm_source=ig_embed

लग्न कुठे होईल, हे स्थळ अद्याप स्पष्ट झालेले नाही. दीपवीर नोव्हेंबरमध्ये लग्न करणार, अशी चर्चा सुरूवातीपासूनचं होती. मध्यंतरी नोव्हेंबरचे मुहूर्त पुढील वर्षाच्या सुरूवातीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचेही वृत्त होते. पण हे वृत्त खोटे ठरवत दीपिका व रणवीरने आपल्या चाहत्यांना लग्नाची गोड बातमी दिली. रणवीर व दीपिका संजय लीला भन्साळींच्या ‘रामलीला’ चित्रपटाच्या शूटींगदरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. तेव्हापासून या कपलच्या लव्हलाईफची चर्चा होती़ अर्थात दीपिका व रणवीर दोघांपैकी कुणीही अधिकृतपणे त्यांच्यातील नाते मान्य केलेले नव्हते. पण म्हणून सार्वजनिक ठिकाणी हे नाते अप्रत्यक्षपणे मान्य करण्यात त्यांनी कुठलीही कसूर ठेवलेली नाही.

दोघांच्याही कामाबद्दल बोलायचे तर रणवीर सध्या ‘सिम्बा’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ‘गली ब्वॉय’ आणि १९९३ व्या क्रिकेट वर्ल्ड कप विजयावर आधारित ‘८३’ या चित्रपटातही तो बिझी आहे. इतकेच नाही तर करण जोहरच्या ‘तख्त’ या मल्टीस्टारर चित्रपटातही त्याची वर्णी लागली आहे. दीपिकाचे म्हणाल तर ‘पद्मावत’नंतर तिने दिग्दर्शिका मेघना गुलजारचा नवा प्रोजेक्ट साईन केला आहे. मेघना गुलजार ‘राजी’, ‘तलवार’ अशा दमदार चित्रपटांसाठी ओळखली जाते. ‘राजी’नंतर मेघना अ‍ॅसिड हल्ल्यासारख्या संवेदनशील मुद्यावर चित्रपट घेऊन येतो आहे. यात दीपिकाची वर्णी लागली आहे. साहजिकचं या चित्रपटात दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेची भूमिका साकारताना दिसणार आहे. तिची ही व्यक्तिरेखा अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी हिच्यापासून प्रेरित असेल.