पिंपरी-चिंचवड शहरातील तोडफोडीच सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. निगडीच्या यमुनानगर परिसरात अज्ञात तिघांनी धारदार कोयत्याने आठ वाहनांची तोडफोड केली आहे. ही घटना शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून शहरात वाहन तोडफोडीचे सत्र सुरू आहे. दहशत माजवणे, मारहाण करणे, वाहनांची तोडफोड करण्याचे प्रकार सुरू असून या सर्व प्रकारात अल्पवयीन आरोपींचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे. निगडी येथे दहशत माजवण्याचा उद्देशाने अज्ञात तिघांनी ओटा स्कीम आणि सिद्धिविनायक मंदिर या ठिकाणच्या आठ वाहनांना लक्ष करत कोयत्याने तोडफोड केली आहे.
याप्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आले नसून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. संशयित तिघे हातात कोयते घेऊन या परिसरात फिरत होते. त्यामुळे शहराच्या नागरिकांनी वाहने कुठे पार्क करायची असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर तोडफोडीप्रकरणी पोलीस प्रशासन मात्र उदासीन दिसत आहे. अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.