महाराष्ट्र अंनिसच्या जिल्हा शाखेला कोल्हापूरात लक्षवेधी पुरस्कार प्रदान
जिल्ह्यातील सहा कार्यकर्त्यांसह दोन शाखांचाही झाला सन्मान
शहादा (प्रतिनिधी) : येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना व शाखांना नुकतेच कोल्हापूर येथे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. याबद्दल त्यांचे समाजातील विविध संघटना आणि मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची विस्तारित राज्य कार्यकारणी बैठक कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथे २ ते ४ जून दरम्यान घेण्यात आली होती. बैठकीत समितीचे मुखपत्र अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण झाले. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आणि शाखांनी प्राविण्य मिळविले. याप्रसंगी महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, अंनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील, राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, पत्रिकेचे संपादक डॉ. नितीन शिंदे, कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
पुरस्कारांमध्ये लक्षवेधी शाखा पुरस्कार नंदुरबार आणि शहादा यांना मिळाले आहेत तर लक्षवेधी कार्यकर्ता पुरस्कार शहादा शाखेतून संतोष महाजन, रवींद्र पाटील, प्रदीप केदारे, श्रीकांत बाविस्कर आणि नंदुरबार शाखेतून किर्तीवर्धन तायडे व वसंत वळवी यांना मिळाले आहेत. त्याचबरोबर लक्षवेधी जिल्हा पुरस्कार देखील नंदुरबार जिल्ह्याला मिळाला असून प्रथमच अंनिसच्या शाखेला इतक्या मोठ्या स्वरूपात पुरस्कार मिळाले आहेत.या कार्यक्रमात नंदुरबार जिल्ह्यातील कामाचे कौतुक करण्यात आले.डाकीण प्रथा विरोधी प्रबोधन मोहिमेची माहिती सुमित्रा वसावे, शीतल वसावे यांनी दिली.वसंत वळवी आणि रवींद्र पाटील यांनी जिल्ह्यातील मागील चार महिन्याचा कामाचा अहवाल सादर केला.
कोल्हापूर येथील बैठकीला कळंबू, मोलगी, शहादा, नंदुरबार आदी शाखांचे १६ कार्यकर्ते उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्यातील शाखांना व कार्यकर्त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, राज्य सरचिटणीस विनायक सावळे, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, प्रधान सचिव वसंत वळवी तसेच जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना आणि मान्यवरांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
फोटो :- पुरस्कार प्रदान सोहळा, डावीकडून अध्यक्ष अविनाश पाटील, विचारवंत आ. ह. साळुंखे, कार्याध्यक्ष माधव बावगे, संपादक उत्तम जोगदंड, पुरस्कार स्वीकारताना नंदुरबार जिल्ह्यातील अनिस कार्यकर्ते.