वैद्यकीय अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे पिडीतेची वैद्येकीय तपासणी रेंगाळली

0

सहाय्यक निरिक्षकांसोबत असभ्य वागणूक

जळगाव : अनेक प्रकारच्या असुविधा, बनावट दाखले यावरुन जिल्हा रुग्णालय चर्चेत आहे. आता त्याच एका बलात्कार पिडीतेची दाखल झाल्यानंतर 36 तास उलटूनही वैद्यकीय तपासणीच झाली नसल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला आहे. एवढेच नाहीतर नमुने घेतल्यांनतर त्यावर लेबलच लावले नाही तसेच कागदपत्रांवर स्वाक्षरीवरुन वैद्यकीय अधिकार्‍यांमध्ये तू तू मे मे पहावयास मिळाली. एवढ्यावरच प्रकरण थांबले नाही तर वैद्यकीय तपासणीला विलंब होत असल्याची कारणे जाणून घेणार्‍या रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरिक्षकांसह कर्मचार्‍याला पारिचारिकेने अरेरावी केल्याचाही धक्कादायक प्रकार घडला. अखेर सायंकाळी उशीरा वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण करुन नमुने घेवून पिडीतेची सुटका करण्यात आली. सरकारी काम व चार महिने थांब असाच प्रयत्य या घटनेवरुन आला.

आवश्यक कागदपत्रांसाठी पिडीतेचीच फिरवाफिरव
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश सुभाषराव पाटील (रा.गणपती नगर, जळगाव मुळ रा. चाळीसगाव) यांच्याविरुध्द 30 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी सोमवारी पहाटे अडीच वाजता रामानंद नगर पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पीडितेला तेव्हाच 3.20 मिनिटांना शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात वैद्यकिय तपासणीसाठी दाखल केले. याठिकाणी तपासणीसाठी आवश्यक कागदपत्रे आणण्यासाठी स्वतः मलाच पाठविण्यात येवून फिरवाफिरव करण्यात आल्याचा आरोपही यावेळी पिडीतेने केला आहे.

सहाय्यक निरिक्षकासह कर्मचार्‍यांना असभ्य वागणूक
मंगळवारी जिल्हा रुग्णालयात दाखल पिडीतेचे परिचारिकांनी काही नमुने घेतले, मात्र त्यावर नाव, एमएलसी क्रमांक असा काही एक उल्लेख नव्हता. केवळ एका खोक्यात ते सील करुन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यानंतर रक्ताचे नमुनेही घेण्यात आले, हे नमुने घेवून पोलीस कर्मचारीच स्वतः या विभागातून त्याच विभागात फिरतांना दिसून आले. 36 तास उलटूनही प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी कर्मचार्‍यांसह जिल्हा रुग्णालय गाठले. पारिचारिकांना नेमकी वैद्यकीय तपासणीस विलंब का होत आहे याचा जाब विचारला असता पारिचारिकांनी बेंद्रे यांच्यासह कर्मचार्‍यांना असभ्य पणाची वागणूक दिली. यानंतर फिरवाफिरव व थेट असभ्य वागणुक मिळाल्याने संतप्त बेंद्रे यांनी कर्मचारी व पिडीतेसह थेट अधीष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांचे दालन गाठले. या दालनात दोन ते तीन तासापर्यंत वैद्यकिय अधिकारी डॉ.दहितोंडे व स्त्री रोज तज्ज्ञ भोळे यांचे स्वाक्षरीवरुन तू तू मे मे झाली. अखेर वरिष्ठांनी सुचना व आदेश दिल्यानंतर नमुन्यांना लेबल लावण्यासह इतर कागदोपत्री पार पडली.