निवडणुकीच्या कामांसाठी शिक्षकांवर सक्ती नाही!

0
शिक्षक भारतीच्या मागणीवर शिक्षण उपसंचालकांचे स्पष्टीकरण 
मुंबई –  निवडणुकीच्या कामासंदर्भात असलेल्या बीएलओच्या कामाची शिक्षकांवर सक्ती नसून त्यांना आपल्या मर्जीनुसार यात सहभागी होता येईल, असे स्पष्टीकरण शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिले. बीएलओच्या कामामुळे दैनंदिन अध्यापनाच्या कामावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे शिक्षकांना त्यातून सूट देण्याची मागणी शिक्षक भारती या संघटनेने शिक्षण उपसंचालकांकडे केली होती, त्यावर संचालकांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
राज्यातील सरकारी, अनुदानितच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील कार्यरत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासंदर्भात असलेल्या बीएलओच्या कामाचे नियोजन जाहीर झाले आहे.  या बीएलओच्या कामामुळे दैनंदिन अध्यापनाच्या कामावर त्याचा परिणाम होत असल्याने शिक्षकांना त्यातून सूट देण्याची मागणी  शिक्षक भारती या संघटनेने  शिक्षण उपसंचालकांकडे केली होती, त्यावर  शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी सांगितले की, शिक्षकांना बीएलओ कामे करणे बंधनकारक नाही, मात्र, त्यांना आपल्या मर्जीनुसार यात सहभागी होता येईल.
दरम्यान, शिक्षक भारतीने या सभेत २ मे २०१२ नंतर नियुक्त शिक्षकांच्या सुनावण्या थांबवा. बीएलओची कामे रद्द करा, २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांचे जीपीएफ अकांऊट सुरू करा, कायम विनाअनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांना वैयक्तिक मान्यता द्या, शिक्षक-शिक्षकेतरांची मेडिकल बीले त्वरीत मंजूर करा, शालार्थ प्रणालीत नाव नसलेल्या शिक्षकांचे वेतन ऑफलाईनने त्वरीत सुरू करा, अशा अनेक मागण्यांबाबत चर्चा केली असल्याची माहीतीही यावेळी दिली.