नियोजन मंडळाची १९ रोजीची सभा गाजणार : १५ कोटी ४० लाखांचा निधी गेला परत
जळगाव – गेल्या तीन वर्षात जिल्हा परीषदेच्या विविध विभागांना कोट्यावधी रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला होता. वितरीत निधीपैकी तब्बल ३० कोटी रूपयांचा निधी आतापर्यंत अखर्चित राहील्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. हा निधी नियोजन विभागाकडे भरणा करण्यासंदर्भात जिल्हा परीषदेला सुचना देण्यात आल्या असुन अधिकार्यांच्या अकार्यक्षमतेमुळे हा निधी पुन्हा खर्च करता येणार नाही. दरम्यान दि. १९ रोजी पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन मंडळाची सभा आयोजीत करण्यात आली असुन अखर्चित निधीवरून हि सभा गाजणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्यात विकासाची कामे करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळामार्फत विविध विभागांना निधी वितरीत केला जातो. हा निधी मुदतीच्या आत खर्च करणे बंधनकारक असते. मात्र असे असतांनाही जिल्हा परीषदेचे अधिकारी व कर्मचार्यांच्या कामचुकारपणामुळे कोट्यावधी रूपयांचा निधी अखर्चित राहील्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. गत तीन वर्षात जिल्हा नियोजन मंडळामार्फत जिल्हा परीषदेच्या विविध विभागांना सुमारे ३७० कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला होता. या वितरीत निधीपैकी जवळपास ३० ते ३२ कोटी रूपयांचा निधी गत तिनवर्षांपासून अखर्चित राहील्याची माहिती समोर आली आहे.
जिल्हा परीषदेत गोलमाल
जिल्हा परीषदेच्या अखर्चित निधीवरून अनेकदा सभांमध्ये अधिकारी व पदाधिकारी यांच्यात शाब्दीक चकमकी उडाल्या. अधिकारी व कर्मचार्यांच्या कामचुकार धोरणामुळे जिल्ह्याच्या विकासकामांना ब्रेक लागत आहे. कोट्यावधी रूपयांचा निधी वितरीत होऊनही काही निधी जर अखर्चित राहत असेल तर ह्यात गोलमाल असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा करून देखिल तीन वर्षात निधी खर्च केला गेला नाही.
वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्याच निधी परत
जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात १५ कोटी ४० लाख रूपयांचा निधी परत गेला आहे. यात वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याच जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी वितरीत करण्यात आलेला तीन कोटी रूपयांचा निधी देखिल परत गेला आहे. तसेच मृद संधारण विभागाचे ३ कोटी ५० लाख, कौशल्य विकास विभाग ३ कोटी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग २ कोटी ५० लाख, जिल्हा ग्रंथालय अधिकारी २ कोटी, पशुसंवर्धन उपायुक्त १ कोटी २५ लाख असा निधी परत गेला आहे.
नियोजन मंडळाची सभा गाजणार
मृद संधारण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कौशल्य विकास विभाग, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा ग्रंथालय या विभागांचा निधी परत गेला असुन जिल्हा परीषदेचा कोट्यावधी रूपयांचा निधी अखर्चित राहीला आहे. दि. १९ रोजी दुपारी १ वा. पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन मंडळाची सभा होणार असुन जिल्हा परीषदेचा विषय हा अजेंड्यावर घेण्यात आला आहे. त्यामुळे अखर्चित निधीवरून नियोजन मंडळाची सभा गाजणार आहे.
जिल्हा परीषदेचा अखर्चित निधी
सर्वसाधारण योजना
वर्ष वितरीत निधी अखर्चित निधी
सन २०१५-१६ १२७ कोटी १४ कोटी
सन २०१६-१७ १२३ कोटी ५ कोटी
सन २०१७-१८ १२० कोटी १० कोटी
आदीवासी उपयोजना
वर्ष वितरीत निधी अखर्चित निधी
२०१५-१६ १९ कोटी १ कोटी ४० लाख
२०१६-१७ २३ कोटी ६० लाख २ कोटी १२ लाख
२०१७-१८ १५ कोटी ३० १ कोटी २० लाख