नविन कामांच्या याद्या सोमवारपर्यंत द्या

0

जिल्हा नियोजन विभागाच्या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

जळगाव – जिल्हा वार्षिक योजनेतून ज्या यंत्रणांना निधी प्राप्त होतो त्यांनी कामांचे नियोजन करताना लोकोपयोगी योजनांचा जास्तीत जास्त समावेश करावा. नागरिकांच्या हिताची कामे होईल यावर भर द्यावा. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता आचारसंहिता लागण्यापूर्वी नवीन कामांना जून अखेरपर्यंत प्रशासकीय मान्यता घेऊन काम पूर्ण करावे, करण्यात येणार्‍या कामांच्या याद्या जिल्हा नियोजन कार्यालयास सोमवारपर्यंत सादर कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज येथे दिल्या.
जिल्हा वार्षिक योजनेबाबतचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जळगाव विभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. डॉ. ढाकणे म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेतून (सर्वसाधारण)२०१९-२० अंतर्गत ३०८ कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर असून १०२ कोटी रुपये इतका निधी अर्थसंकल्पीय प्रणालीवर प्राप्त झाला आहे. ज्या विभागांच्या कामांच्या याद्या प्राप्त होतील. त्यांना प्राधान्याने निधीचे वाटप करण्यात येईल. २०१८-१९ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून (सर्वसाधारण) जिल्हा परिषदेकडील योजनांसाठी अर्थसंकल्पीय प्रणालीवर शिल्लक असलेला निधी आहरीत करून ठेवण्यात आला आहे. त्या योजनानिहाय व कामनिहाय याद्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने जिल्हा नियोजन समितीस सादर कराव्यात व त्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता घेऊन कामांवर निधी खर्च करावा. त्याचबरोबर वितरित करण्यात आलेला निधी कोणत्या कामांवर खर्च करण्यात आला याची माहिती तातडीने सादर करावी.

नावीन्यपूर्ण उपक्रम/योजना सुचवा
जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात नावीन्यपूर्ण उपक्रम/योजना राबविण्यासाठी निधी राखीव असतो. या निधीमधून जिल्ह्यात वैशिष्टपूर्ण कामे व्हावीत. यासाठी सर्व संबंधित विभागांनी जिल्ह्याच्या विकासात भर घालण्याबरोबरच जिल्ह्यात वैशिष्टपूर्ण ठरतील अशी कामे सुचवावी. जे विभाग असे नावीन्यपूर्ण उपक्रम/ योजना सुचवतील अशा विभागांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी केल्या.