डाॅक्टर बापलेकीचं पक्षांतर !

अगतिक भाजपा अन् डॉ.पाटलांची अपरिहार्यता

जळगावचे माजी खा.डॉ.उल्हास पाटील हे खान्देशच्या वैद्यकीय क्षेत्रातील मोठं प्रस्थ. प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ म्हणून स्व.डॉ.अविनाश आचार्य, स्व.डॉ. उल्हास कडुसकर दाम्पत्यानंतर गोदावरी हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वाधिक लोकप्रियता मिळाली ती डॉ. उल्हास पाटील आणि डॉ.सौ.वर्षा पाटील या दाम्पत्याला. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या डॉ.उल्हास पाटील यांना माजी विधानसभाध्यक्ष मधुकरराव चौधरी यांनी 1998 मध्ये झालेल्या लोकसभेच्या पोट निवडणूकीत काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली. या निवडणूकीत भाजपा उमेदवाराचा पराभव करून डॉ.पाटील यांनी विजय संपादन केला. खासदार म्हणून 13 महिन्यांचा अत्यल्प कार्यकाळ डॉ.पाटील यांच्या वाटेला आला. मात्र, आपल्या कुशाग्र बुध्दीमत्ता, विनम्र स्वभाव आणि काम करण्याची जिद्द या अंगी उपजत असलेल्या गुणांमुळे कुणाला जमले नाही ते डॉ.उल्हास पाटील यांनी करून दाखविलं. गोदावरी फाऊंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालयाची मुर्हुतमेढ रोवत त्यांनी आज शैक्षणीक क्षेत्रात स्वत:च साम्राज्य उभे केले. 1978 मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना काँग्रेसचे सक्रिय सदस्य असलेल्या डॉ.उल्हास पाटील यांनी गांधी कुटूंबात थेट स्थान प्राप्त केले. मात्र, 2014 मध्ये राष्ट्रीय राजकारणात मोदी नावाचे वादळ आले आणि काँग्रेसची वाताहत झाली. देशातील प्रस्तापितां प्रमाणे आता डॉ.उल्हास पाटील यांनी भाजपाची वाट धरली आणि 1978 पासून काँग्रेससोबत सुरू असलेला त्यांच्या राजकीय प्रवासाचा शेवट झाला. वैद्यकिय, व्यावसायीक शिक्षणाचं साम्राज्य उभे केलेल्या डॉ.उल्हास पाटील आणि त्यांचा राजकीय वारस असलेल्या कन्या डॉ.केतकी पाटील यांचा भाजपा प्रवेश तसा जिल्ह्याला अपेक्षीत असाच असल्याने राजकीय भुकूंप, राजकीय हादरा वैगरे यांसारखे चित्र काही दिसून आले नाही. जिल्ह्यात मुळात काँगे्रसची अवस्था अतिशय दयनीय आहे. रावेरचे आ.शिरिष चौधरी यांचा अपवाद वगळता प्रत्येक तालुक्यात बोटावर मोजता येतील एवढेच नेते आणि कार्यकर्ते शिल्लक आहेत. अशात डॉ.उल्हास पाटील यांचा पक्षप्रवेश करून भाजपाने मोठी कामगिरी केली, असं म्हणणं कुणालाही पटणार नाही. निपचीत पडलेल्या वनराजच्या पार्थिवा शेजारी उभे राहून शिकार केल्याची शेखी मिरविण्याचा इतिहास राहिला आहे. अशीच काहीशी तुलनात्मक चर्चा या पक्षप्रवेश सोहळ्याची आहे. हा पक्ष प्रवेश सोहळा जिल्ह्याच्या राजकारणात सर्वात शक्तीशाली पक्ष असलेल्या भाजपाची अगतिकता म्हणावी की शैक्षणीक साम्राज्याचे धनी असलेल्या डॉ.उल्हास पाटील यां ची अपरिहार्यता? हाच प्रश्‍न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.

13 महिने खासदारकी मिळालेल्या डॉ.उल्हास पाटील यांनी एकट्याने गेली 26 वर्ष शक्तीशाली भाजपाला झुंज दिली. 1998, 1999, 2004, 2014 आणि 2019 असा पाच लोकसभा निवडणूकीत डॉ.उल्हास पाटील यांनी भाजपाला विजयासाठी झुंजविले. यात 2014 चा अपवाद वगळता डॉ.पाटील यांनी चार निवडणूकीत काँग्रेसचीच उमेदवारी केली. 26 वर्षाच्या राजकीय वाटचालीत 2014 पर्यंत निवडणूकीतील विजय आणि पराभव याचा कोणताच परिणाम डॉ.उल्हास पाटील यांच्या प्रगतीवर कधीच झाला नाही. केंद्रात सत्ता असलेल्या काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांची मर्जी जिंकण्यात यशस्वी झालेल्या डॉ.उल्हास पाटील यांनी राजकारण आणि वैयक्तीक प्रगती याची कधीच सरमिसळ होवू दिली नाही. म्हणूनच प्रत्येक निवडणूक लढविणार्‍या डॉ.उल्हास पाटील यांनी पक्ष संघटनेत ढवळाढवळ न करता पक्षश्रेष्ठींच्या वरदहस्ताने गोदावरी फाऊंडेशनच्या माध्यमातून भव्य शैक्षणिक संकूलाचीच उभारणी चाणाक्षपणे केली. स्व.मधूकरराव चौधरी यांचा अपवाद वगळता जिल्ह्यात कोणत्याच मातब्बराला जमले नाही ते साम्राज्य उभे करण्यात डॉ.उल्हास पाटील यशस्वी झाले. राजकारण करतांना कुणासोबतही वैयक्तिक हितसंबंध खराब होणार नाही याची काळजी घेणार्‍या डॉ.पाटील यांनी सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांसोबत मैत्री जपली.

मात्र, 2014 नंतर राजकारणाची दिशाच पालटली. मोदी नावाच्या लाटेत काँगे्रस खिळखिळी झाली. दिवसेंदिवस काँग्रेसची अवस्था दयनीय होत गेली. ‘काँग्रेस मुक्त भारत’ ही घोषणा बुलंद करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘साम, दाम, दंड, भेद’चा वापर करीत काँगे्रसचा सफाया सुरू केला. अशात वर्षानुवर्ष काँगे्रसचे पाईक असलेलेल्या राजकीय वतनदारांनी आपली संस्थाने आबाधीत ठेवण्यासाठी भाजपाची वाट धरली. ज्यांनी या लाटेचा मुकाबला करण्याचा प्रयत्न केला त्यांची वाताहत झाल्याचे संपूर्ण देशाने पाहिले. या आधुनिक राजकारणाचा अंदाज आलेल्या जिल्हावासियांना कधीपासून डॉ.उल्हास पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची प्रतीक्षा होती. सद्या स्थितीत भाजपा प्रचंड आक्रमक पध्दतीने विरोधकांना नामोहरम करून आपली वाटचाल प्रशस्त करीत असतांना मोठ्या कष्टानं उभे केलेलं साम्राज्य पणास लावून काँग्रेसचा पंजा बळकट करण्यात शहाणपण निश्‍चितच नाही, हे डॉ.उल्हास पाटील यांना कुणी पटवून देण्याची गरज नाही. शिवाय, काळ कुणासाठी थांबत नाही. वाढत्या वयामुळे आपल्या पुढच्या पिढीला संर्घषाचा वारसा देवून आहे ते सांभाळण्यात शक्ती खर्च करायची की निष्ठा बदलवून वारसाला सत्तेच्या खुर्चीत विराजमान करून आपल्या साम्राज्याला राजाश्रय प्राप्त करून द्यायचा? हे दोन पर्याय डॉ.उल्हास पाटील यांच्या समोर असावेत. चाणाक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी संघर्ष सोडून भाजपाची वाट धरली. काँग्रेस आणि त्या पक्षाच्या नेत्यांच्या नावाने शिमगा करत डॉ.उल्हास पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. शैक्षणिक साम्राज्य उभे केले असले तरी कार्यकर्त्यांचे संघटन उभे करण्यात डॉ.उल्हास पाटील यांना अपयश आले हे वास्तव आहे. म्हणूनच कर्मचारी भरपूर असले तरी कार्यकर्त्यांचा अभाव असल्यामुळे त्यांना पाच वेळा पराभव स्विकारावा लागला आहे. कर्मचार्‍यांच्या भरवशाने निवडणूक जिंकणे शक्य नसल्याचे डॉ.पाटील यांनी ओळखले. भाविष्यात मुलगी डॉ.केतकी पाटील यांना सत्तेच्या खुर्चीवर बसविण्यासाठी कार्यकर्त्यांची भक्कम ताकद असलेले ङ्गकमळफ हाती घेण्या शिवाय पर्याय नसल्याची जाणिव झाल्यामुळेच राजकीय अपरिहार्यता म्हणूनच या डॉक्टर बापलेकीने भाजपात प्रवेश केला असल्याची भावना जनमानसात झाली आहे.

दुसरीकडे कार्यकर्त्यांचा भक्कम ताकदीवर सलग पाच वेळा निवडणूकीत पराभवाची धुळ चारणार्‍या डॉक्टर उल्हास पाटील यांना पक्षात घेवून भाजपाने काय साध्य केलं? असा प्रश्‍न उपस्थित होणे अपेक्षीत आहे. आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी नरेंद्र मोदी हा ब्रँण्डच पुरेसा असल्याचा दावा भाजपाचे कार्यकर्ते आणि नेते करतात. विद्यमान खासदार रक्षा खडसे यांची मतदारसंघात कामगिरी उत्तम आहे. मात्र, एकनाथराव खडसे यांच्यावर भाजपा श्रेष्ठींच्या असलेल्या वक्रदृष्टीचा फटका त्यांना बसणार, हे गृहीत धरले जात होते. मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना आव्हानच दिले आहे. स्व.हरिभाऊ जावळे यांची ऐनवेळी रद्द केलेली उमेदवारी रक्षा खडसे यांना दिल्यापासूनच खडसे आणि महाजन यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. या वादाचा शेवट आता रक्षा खडसे यांचा पत्ता कट करण्याने होणार? एवढाच अन्वयार्थ डॉ.उल्हास पाटील, डॉ.केतकी पाटील यांचा भाजपा प्रवेशाचा काढला जात आहे.

खा.रक्षा खडसेंना उमेदवारी नाकारायची तर सक्षम पर्यायी उमेदवाराची विचारणा पक्षश्रेष्ठी करतीलच.

उमेदवार देवून त्याच्या विजयाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावरच राहील. अशा परिस्थितीत स्व.हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांना उमेदवारी देवून एकनाथ खडसेंचा खिशोब स्वबळावर चुकता करण्याची संधी महाजन यांना होती. मात्र, या प्रवेश सोहळ्यामुळे

महाजन यांच्या हातून ही संधी हिरावून गेली. डॉ.केतकी पाटील यांना भाजपाकडून उमेदवारीचे सध्यातरी संकेत नसले तरी त्यांना उमेदवारी मिळणारच नाही, असे कुणी म्हटलेलेही नाही. उमेदवारी नाकरण्यात आल्यास रक्षा खडसे थेट सासरे एकनाथराव खडसे नेते असलेल्या राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उतरतील. या परिस्थितीत अमोल जावळे यांच्या विजयासाठी मंत्री गिरीष महाजन यांना सर्व शक्तीनिशी रावेरमध्येच ठाण

मांडून विजयश्री खेचून आणावी लागेल. दुर्दैवाने पराभव वाट्याला आलाच तर गिरीश महाजन यांची प्रतिमाही पक्षात धुसर होवू शकते. हे सर्व गृहीत धरूनच महाजन यांनी डॉक्टर बाप-लेकीचा भाजपात प्रवेश घडवून आणला असण्याची शक्यता जास्त आहे. डॉ.केतकी पाटील यांना उमेदवारी देवून महिले विरूध्द महिला रिंगणात उतरवायची. मुलगी डॉ.केतकीला सत्तेच्या खुर्चीवर विराजमान करण्यासाठी डॉ.उल्हास पाटील आपले सर्वस्व पणाला लावतील, यात कुणाच्या मनात शंका नसावी. म्हणजेच डॉ.केतकी पाटील यांचा विजय हा गिरिष महाजन नव्हे तर डॉ.उल्हास पाटील यांच्यासाठी निर्णायक ठरेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

मात्र, असे झालेच तर डॉक्टर बाप-लेकीचा पक्षप्रवेश भाजपाची अगतिकताच ठरणार आहे. अमोल जावळे यांच्यासह भाजपात अनेक दिग्गज रावेर लोकसभा मतदारसंघांसाठी इच्छुक आहेत. रक्षा खडसे यांना पर्याय म्हणून पक्षातील निष्ठावंत इच्छुकांनाही डावलण्यात आले तर याची मोठी किंमत भाजपाला मोजावी लागू शकते. मुळातच जिल्हा भाजप आणि मतदारसंघात खा.रक्षा खडसे यांनी स्वकर्तृत्वाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. खडसेंना मानणार्‍या कार्यकर्त्यांची संख्या पक्षात खुप मोठी आहे. खडसेंना डावलले तर पक्षातील निष्ठावंतांना संधी का नाही? असा प्रश्‍न कार्यकर्ते उपस्थित करू शकतील. गल्लीपासून दिल्ली पर्यतची सत्ता, मोदी नावाचा ब्रँण्ड आणि सोबतीला शिवसेना, राष्ट्रवादीची ताकद असतांनाही उमेदवार आयात का करावा लागला? 26 वर्ष ज्या डॉ.उल्हास पाटील यांच्याशी संघर्ष करीत पक्षाला विजयश्री मिळवून दिली. त्याच परिवारातील सदस्याच्या विजयासाठी का राबायचे? हे प्रश्‍न भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्याला पडले तर मात्र, पक्षाची अधिक कोंडी होवून असंतोष माजेल आणि याचा लाभ खडसे परिवाराला आपसूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, पाटील कुटूंबियांना उमेदवारी भेटो नको भेटो पण या प्रवेश सोहळ्याचे नकारात्मक संकेत भाजपा कार्यकर्त्यांमध्ये निश्‍चित जाण्याची शक्यता आहे. म्हणूनच हा प्रवेश भाजपाची अगतिकता तर ठरणार नाही ना? या प्रश्‍नाचे उत्तर आगामी काळच देईल.

 

– जळगाव, मो. : 7498949201 bharatchaudhari0531@gmail.com