पुणे-अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन प्रकाशराव अंधुरे याला २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे. आज १२.३० सुमारास त्याला सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजार केले असता त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली. पुणे न्यायालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात लकरण्यात आला होता.
न्यायालयामध्ये सीबीआयच्या वकिलांकडून १४ दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती, पण विशेष न्यायाधीश अर्चना मुजुमदार यांनी त्याला ७ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावली आहे. सचिन अंधुरे हा प्रत्यक्ष मारेकरी आहे, त्याच्याकडून हत्यार आणि वाहन ताब्यात घ्यायचे आहे. त्याने ट्रेनिंग कुठे घेतली, कोणी त्याला ट्रेनिंग दिली होती याची माहिती आरोपीच्या चौकशीतून समोर येऊ शकते त्यामुळे १४ दिवसांची कोठडी देण्याची मागणी सीबीआयच्या वकिलांकडून करण्यात आली होती.
केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभाग सीबीआयने शनिवारी औरंगाबाद येथून सचिन प्रकाशराव अंधुरे याला अटक केली होती. दरम्यान, माझ्या भावावरील आरोप चुकीचे असून त्याला याप्रकरणात फसवले जात आहे असा आरोप आरोपीचा भाऊ प्रवीण अंधुरे यांने न्यायालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना दिली.
नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटकेत असलेल्या शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंधुरेचे नाव समोर आले. सचिन आणि शरद दोघे मित्र आहेत. एटीएसने दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमधून सचिनला ताब्यात घेतले. त्याचा गुन्ह्यात सहभाग असेल तर त्याला अटक केली जाईल अन्यथा सोडून देऊ असे एटीएस अधिकाऱ्यांनी सचिनच्या कुटुंबियांना सांगितले होते. त्याचा गुन्ह्यातील सहभाग समोर आल्यानंतर त्याला अटक करुन सीबीआयकडे सोपवण्यात आले.