डॉ. मानसी चौधरी यांचा कनुभाई सावडिया सुवर्ण पदकाने सन्मान

जळगाव, प्रतिनिधी – महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा अकरावा पदवीदान समारंभ नुकताच संपन्न झाला. या सोहळ्यात जळगाव येथील रहिवासी डॉ. मानसी योगेश चौधरी यांना कनुभाई सावडिया सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या डाॅ. मानसी चौधरी यांना वेटनरी पब्लिक हेल्थ या विषयात केलेल्या संशोधनासाठी हे सुवर्णपदक देण्यात आले.

विद्यापीठाच्या अकराव्या पदवीदान समारंभात २०२१ ते २४ या शैक्षणिक वर्षातील १३४० पदवीधर, ९९ पदव्युत्तर, ३० डॉक्टररेट अशा एकूण १७९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. या पदविदान सोहळ्यात उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल ७२ सुवर्णपदक, २३ रोप्य पदक आणि २५ हजार रुपयांचे तीन रोख पारितोषिक देण्यात आले. एकूण ९५ पदक व तीन रोख बक्षिसांपैकी २८ पदक आणि तीन रोख बक्षिसांवर मुलींनी बाजी मारली.

व्हीपीएच या विषयांतर्गत प्राणी आणि मानव या दोन जमातींचा अभ्यास केला जातो. यामध्ये माणसांना प्राण्यांपासून किंवा प्राणीजन्य पदार्थांपासून होणाऱ्या आजारांवर संशोधन केले जातो. या सर्वांसह पर्यावरणीय स्वच्छता व सुरक्षा या संदर्भात कायदे आणि उपाय योजना देखील निश्चित करण्यात येतात. मास, मासे, अंडी यांच्या उत्पादनात योग्य ठिकाणी योग्य त्यावेळी योग्य ते कायदे व उपाययोजना अंमलात आणून मानवतेचे हित जोपासण्याचा मुख्य हेतू यात असतो.

भारत हा जगातील सर्वात जास्त दुग्ध उत्पादक देश आहे. तसेच अंडी उत्पादनात जगात तिसरा, मांस उत्पादनात आठवा देश आहे. कृषीप्रधान असल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था शेती व पशुपालनावर आधारित आहे. आपल्या देशातील अनिश्चित हवामान व पाऊस यामुळे पशुपालन हे शेतकऱ्यांसाठी उपजिविकेचे एक महत्त्वाचे साधन आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणात पशु विज्ञान व पशु शेती महत्त्वाची भूमिका बजावणारे क्षेत्र आहे.

या पदवीदान सोहळ्याचे अध्यक्षस्थान ऑनलाईन पद्धतीने राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांनी भुषविले. कुलगुरू डाॅ. श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष अतिथी म्हणून प्रतिकूलपती ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचा संदेश वाचण्यात आला. या सोहळ्याला डॉ. नितीन विखे पाटील, डॉ. नितीन कुरकुरे उपस्थित होते.

डॉ.मानसी चौधरी यांना डॉ.शिल्पुश्री शिंदे, डॉ.संदीप चौधरी, डॉ.नितीन कुरकुरे, डॉ.सुनील कोलते, डॉ.संजय बानूबाकोडे, डॉ.मनोज पाटील व डॉ.शितल चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले.