“डॉ. तुषार पाटील ठरले भुसावळचे पहिले कॉग्रेड मॅरेथॉन रनर : दक्षिण आफ्रिकेत ८७.७ किमी धावून उंचावले भुसावळचे नाव”
भुसावळ स्पोर्टस अँण्ड रनर्स असोसिएशनचे धावपटू व शहरातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. तुषार पाटील यांनी दक्षिण आफ्रिकेतील जगप्रसिद्ध व प्रतिष्ठीत कॉम्रेड मैरेथॉन मध्ये ८७.७ किमी ११ तास ३९ मिनिटात धावून यशाला गवसणी घातली. अशी कामगिरी बजावणारे ते भुसावळ शहरातील प्रथम धावपटू ठरले. याआधी जिल्ह्यातून केवळ जळगावचे निलेश भांडरकर यांनी ३ वर्षापूर्वी ही स्पर्धा यशस्वीपणे निर्धारीत वेळेत पूर्ण केली आहे.
रविवारी ११ जून रोजी स्थानिक वेळेनुसार दक्षिण आफ्रिकेतील पीटर्सबर्ग येथून टिक ५:३० वाजता स्पर्धेस मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. जगभरातून सुमारे १८,००० धावपटू यामध्ये सहभागी झाले होते. ठिक १२ तासांनी उतार उतरून डरबन येथे संध्याकाळी ५:३० वाजता ९६ व्यांदा ही स्पर्धा संपन्न झाली. स्थानिक धावपटूनंतर परदेशातील सर्वाधिक ४०३ धावपटू भारतीय होते, धावपटूंची सर्वच स्तरावर कसोटी बघणारी ही स्पर्धा असते.
आपल्या वैदयकीय व्यवसायातील व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून डॉ. तुषार पाटील कित्येक महिन्यांपासून या स्पर्धेसाठी कसून सराव करीत होते. काही वेळा त्यांनी पुणे येथे जाऊन देखील सराव केला, मेरेथॉन सुरु असतांना अर्ध्या अंतरानंतर पायाचे स्नायू ताणले गेल्याने स्पर्धा अर्धवट सोडावी की काय असे देखील त्यांना वाटले, परंतु अशाही परिस्थितीत अतिशय निर्धाराने व जिद्दीने त्यांनी ही स्पर्धा पूर्ण केली.
- त्यांच्या या यशामुळे भुसावळचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उचावले असून भुसावळ शहरातील असंख्य नागरीकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
डॉ. तुषार पाटील यांचे बुधवारी सकाळी शहरात आगमन होणार असून भुसावळ स्पोर्टस अँड रनर्स असोसिएशनचे धावपटू, सायकलपटू व जलतरणपटू मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करण्यासाठी आतूर असल्याचे प्रा. प्रविण फालक व प्रविण पाटील यांनी यावेळी सांगितले.