‘एक दिवस उमेदवारासोबत’ : आघाडीचे उमेदवार डॉ.उल्हास पाटील यांच्या पायाला १२ तास ‘भिंगरी’
जळगाव – (चेतन साखरे) एकेकाळी काँग्रेसचा व आता भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या रावेर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे यंदा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे. हा मतदारसंघ लेवासमाज बहूल असल्याने काँग्रेसनेही लेवाकार्ड खेळले आहे. लेवाकार्डासह गोदावरी हॉस्पीटलच्या माध्यमातून करण्यात येणार्या रुग्णसेवेमुळे डॉ.उल्हास पाटील हे नाव घराघरात पोहचले आहे. याचा प्रत्यय ‘जनशक्ति’च्या ‘एक दिवस उमेदवारासोबत’ या उपक्रमात आला. मतदारसंघात प्रचार करतांना प्रत्येक ठिकाणी एकाच गोष्टीचा प्रत्यय वारंवार आला. तो म्हणजे डॉ.उल्हास पाटलांनी कुणावर मोफत तर कुणावर अल्पदरात केलेल्या उपचारामुळे रुग्णांना जीवनदान मिळाले. ‘दुवाओं मे याद रखना’ या वाक्याची प्रचितीही जागोजागी आली. जेंव्हा डॉ.पाटील मत मागत होते तेंव्हा अनेकांनी ‘डॉक्टर साहेब हे दुसरे आयुष्य तुमच्यामुळेच मिळाले आहे’, असे म्हणत कृतज्ञता व्यक्त केली. डॉक्टराच्या हॉस्पीटलमध्ये जशी ओपीडी फुल्ल भरलेली असते तसाच काहीसा प्रकार प्रचार दौर्यादरम्यान जागोजागी आला.
डॉ.उल्हास पाटील म्हणजे एक अजब रसायन आहे. या व्यक्तीचा स्टॅमिना व प्रचंड उत्साह हा इतरांना लाजवेल असाच होता. विशेष म्हणजे सकाळी सहा वाजता प्रचार सुरु झाल्यापासून सायंकाळी उशिरा प्रचार संपेपर्यंत यात तिळमात्रही फरक दिला नाही. आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील हे पहाटे ६ वाजेपासूनच प्रचाराच्या मैदानात उतरतात. प्रचारासाठी निघण्यापुर्वी पहाटे ४ वा. उठुन व्यायाम व इतर कामे उरकुन प्रचारासाठी मार्गस्थ होतात. सुरवातीला गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रचाराशी संबंधित पदाधिकार्यांशी चर्चा करून मतदारसंघाकडे मार्गक्रमण करतात. त्यांच्या वाहनामागे पाच ते सहा वाहनांचा ताफा असतो. सकाळी ७ वा. रावेर मतदारसंघात पोहचून ठरल्यानुसार त्या गावातील नागरीकांच्या ते भेटी घेतात. यादरम्यान प्रत्येक गावात त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले जाते. संपुर्ण गावात रॅली काढुन मतदारांशी ते संवाद देखिल साधतात. काही मिनीटापुरता का होईना पण उमेदवाराने संवाद साधला याचेच समाधान सर्वसामान्य नागरिकांच्या चेहर्यावर दिसुन येते. प्रचारात सहभागी होणार्या प्रत्येक कार्यकर्त्याची डॉ. उल्हास पाटील हे आस्थेवाईकपणे चौकशी करून त्याची काळजी घेतांना देखिल दिसले. भर उन्हात मतदारसंघातील किमान २० ते २४ गावे फिरुन पालथी घालण्यात आली. प्रचारादरम्यान प्रत्येक गावात थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेत डॉ. उल्हास पाटील यांनी मतदारसंघातील प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. सकाळी ७ वा. प्रचाराला सुरवात केल्यानंतर प्रत्येक गावात रॅली काढून डॉ. उल्हास पाटील यांनी मतदारांना आवाहन केले. सकाळी ७ वाजता सुरू झालेला प्रचार सायंकाळी ७ वाजता निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार थांबविण्यात आला. तब्बल १२ तास अनेक गावांमध्ये भेटी देऊन डॉ. उल्हास पाटील अविरतपणे प्रचार करित आहे.
१९९८ नंतर रावेर मतदारसंघात ‘पंजा’ पुन्हा घराघरात
सन १९९८ मध्ये काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी भाजपाच्या डॉ. गुणवंतराव सरोदे यांना पराभूत करून खासदारकी मिळविली होती. मात्र अवघा १३ महिनेच त्यांना मिळाले. या १३ महिन्याच्या कालावधीत डॉ. उल्हास पाटील यांनी शैक्षणिक संस्था उभ्या करून शिक्षणाची गंगोत्री तर आणलीच पण त्यांनी या संस्थांच्या माध्यमातुन रोजगार देखीलल मिळवुन दिला. १९९८ नंतर ह्या मतदारसंघातुन राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी केली होती. यावेळी मात्र ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली. जागा सुटल्यानंतर काँग्रेसकडून माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळाली. या मतदारसंघात भाजपाच्या रक्षाताई खडसे ह्या विद्यमान खासदार आहेत. तसेच रावेर मतदारसंघावर माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांचा प्रभाव आहे. हा मतदारसंघ लेवाबहुल असल्याने काँग्रेसनेही लेवा कार्ड वापरून डॉ. उल्हास पाटील यांना रणांगणात उतरविले आहे. निवडणुकांचा पुर्वानुभव असलेल्या डॉ. उल्हास पाटील यांनी देखील समांतर यंत्रणा कामाला लावली.
अल्पसंख्याक आणि मागसवर्गीय मतदारांकडे लक्ष केंद्रीत
या मतदारसंघात अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय मतदारांची संख्या ही निर्णायक आहे. तसेच हा मतदार पुर्वीचा काँग्रेसी विचारसरणीचा आहे. गत २० वर्षात काँग्रेसचा ‘पंजा’ या मतदारसंघातुन गायब राहील्याने या मतदारांसमोर पर्याय नव्हता. मात्र यावेळेला डॉ. उल्हास पाटील यांच्या रूपाने पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे हक्काचा आणि निर्णायक असलेल्या या मतदारांवर काँग्रेससह आघाडीने लक्ष केंद्रीत केले आहे. रावेर मतदारसंघात बोदवड परिसर सिंचन योजना, मेगा रिचार्ज योजना, शेळगाव बॅरेज यासह छोटे-छोटे सिंचनाची कामे रखडली आहे. आघाडीकडून निवडणुकीत याच मुद्यांवर भर दिला जात आहे. याच मुद्यांवरून भाजपाला घेरण्याची रणनिती आघाडीकडुन आखण्यात आली आहे. मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला दिलेली आश्वासने पाळली गेली नसल्याचा आरोप आघाडीने केला आहे.
आघाडीत एकीचे दर्शन
लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीरीपा, शेकाप व मित्रपक्षांची महाआघाडी जाहीर झाली आहे. त्यामुळे डॉ. उल्हास पाटील हे महाआघाडीचे उमेदवार म्हणून जाहीर झाले आहेत. आघाडीचे उमेदवार असल्याकारणाने राष्ट्रवादीने देखिल ‘अभी नही तो कभी नही’ ही बाब ध्यानात घेऊन डॉ. उल्हास पाटील यांच्या पाठीशी यंत्रणा खंबीरपणे उभी केली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, माजी आ. अरूण पाटील, जामनेर राष्ट्रवादीचे नेते संजय गरूड, डी.के.पाटील, भुसावळातुन पीरीपाचे जगन सोनवणे, राष्ट्रवादीचे उमेश नेमाडे, यांच्यासह काँग्रेसचे माजी आ. शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, रावेर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, चोपडा येथील जि.प.चे सभापती दिलीप पाटील, गटनेते प्रभाकर सोनवणे, यांच्यासारख्या दिग्गजांची फळी कामाला लागल्याने या मतदारसंघात आघाडीत एकीचे दर्शन दिसू लागले आहे.