अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल करणारे डॉ. अभिषेक हरिदास यांना परांजपे परिसर कर्वेनगर पुणे येथे अज्ञात लोकांनी अडवून दिली जीवे मारण्याची धमकी.

सिल्लोड  | प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सिल्लोड येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली व पुण्यातील डॉ.अभिषेक हरिदास यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेट अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांनी सिल्लोड सोयगाव निवडणूक 2014 व 2019 मधील शपथपत्रांमध्ये खोटी माहिती नमूद केल्या कारणाने सीआरपीसी 200 अंतर्गत लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1951 मधील कलम 125 नुसार याचिका क्रमांक 461/2023 दाखल करून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सदर प्रकरणांमध्ये सिल्लोड न्यायालयाने प्रथमदर्शनी अब्दुल सत्तार दोषी असल्याचे निष्कर्ष काढून न्यायालयात गुन्हा दाखल करून घेतलेला असून, सध्या प्रकरणांमध्ये कायदेशीर कार्यवाही प्रलंबित आहे.
अब्दुल सत्तार यांनी सदर प्रकरणांमध्ये सेशन कोर्ट औरंगाबाद येथे रिव्हीजन दाखल केलेली असून, त्यात दिनांक 04.10.2023 रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आलेली आहे. अब्दुल सत्तार यांच्या विरोधात याचिका दाखल करणारे डॉ. अभिषेक हरिदास यांना काल रात्री पुण्यात परांजपे परिसरात कर्वेनगर पुणे येथे अज्ञात लोकांनी त्यांची गाडी अडवून त्यांना धमकावले. डॉ. अभिषेक यांच्या तक्रारीनुसार अज्ञातांनी त्यांना धमकावून सांगितले की, सेशन कोर्टातील न्यायाधीश आम्ही मॅनेज केलेला आहे व तो आमच्याच जातीचा आहे. त्यामुळे आता आमचे काहीही वाकडे होणार नाही, जर तुम्ही 4 तारखेला कोर्टात उपस्थित झाल्यास तुम्हाला जीवानाशी ठार करण्यात येईल. डॉ. अभिषेक यांनी सदर प्रकरणांमध्ये ई-मेल द्वारे चीफ जस्टीस उच्च न्यायालय मुंबई सह पोलिसांना तक्रार पाठवलेली आहे.
विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वी याचिकाकर्ता महेश शंकरपेल्ली यांच्यावर सिल्लोड तहसील कार्यालयात अब्दुल सत्तार यांचा पीए बबलू सह सत्तारच्या कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्ला करून, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. सदरील प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. या प्रकरणातील तपास पूर्ण होण्याच्या अगोदरच याचिकाकर्ता डॉ. अभिषेक यांना सुद्धा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा संपूर्ण बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.