ड्रग्स माफिया ललित पाटील याला उद्धव ठाकरे यांचेच संरक्षण
कोठडीत ललितची चौकशीच झाली नसल्याचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा
मुंबई, प्रतिनिधी – ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज गंभीर आरोप केले. ललितला डिसेंबर २०२० मध्ये अटक झाली तेव्हा उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे यांनीच ललित पाटील याच्याकडे तेव्हाच्या शिवसेनेच्या नाशिक जिल्ह्याचे प्रमुखपद सोपवले होते. ललित पाटील याला अटक झाल्यावर लगेच पीसीआर मागण्यात आला. गुन्हा मोठा असल्याने याप्रकरणात लगेच पीसीआर देण्यात आला. ललित पाटील याला पीसीआर मिळाल्याबरोबर त्याला लगेच ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर सरकारी पक्षाकडून ललित पाटीलच्या चौकशीसाठी कोणताही अर्ज करण्यात आला नाही. पोलिसांकडून ललित पाटील याची चौकशीच झाली नाही. पीसीआरचा १४ दिवसांचा कालावधी संपल्यानंतर ललित पाटील याला न्यायालयीन कोठळी द्यावी लागली. या काळातही त्याची चौकशीच झाली नाही. यामागील कारण काय होतं? या सगळ्याला उद्धव ठाकरे जबाबदार होते की, गृहमंत्री. ललित पाटीलची चौकशी न करण्यासाठी कोणाचा दबाव होता? असा सवाल करीत या प्रकरणात खूप सांगण्यासारखे आहे. मात्र, आत्ताच मी काही सांगणार नाही, असे स्पष्ट करून देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणातील सस्पेन्स कायम ठेवला आहे.
याच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. आधीच्या सरकारांनी केलेले पाप आपल्या माथी नको, अशी भूमिका त्यांनी मांडली. कंत्राटी भरतीवरून युवकांच्या मनात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगून हे पाप काँग्रेस-राष्ट्रवादीचेच असल्याचे सांगून शरद पवारांच्या आशीर्वादानेच मुख्यमंत्री असतांना उद्धव ठाकरे यांनीही कंत्राटी भरतीची निविदा काढली होती. मात्र हे लोक स्वत:चं पाप आमच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली असून कंत्राटी भरतीचा जीआर आम्ही रद्द करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.