धनादेश अनादरप्रकरणी डी. एस. कुलकर्णीसह पत्नीलाही कोर्टाचे समन्स!
पुणे : आर्थिक अडचणीत सापडलेल्या डीएसके उद्योग समूहाला आणखी एक झटका बसला आहे. धनादेश अनादर झाल्याप्रकरणी गुंतवणूकदारांनी डी. एस. कुलकर्णीसह त्यांच्या पत्नी हेमांती व संचालकांविरोधात दिवाणी न्यायालयात धाव घेतली असून, कण्टोमेन्ट कोर्टात प्रकरण दाखल केले आहे. त्यानुसार, न्यायालयाने डीएसकेसह त्यांच्या पत्नी व संचालकांना समन्स जारी करत, पुढील सुनावणी 26 ऑक्टोबररोजी ठेवली आहे. या तारखेला डीएसकेसह त्यांच्या पत्नी व संचालकांना कोर्टापुढे हजर व्हायचे आहे. डीएसके समूहाच्यावतीने गुंतवणूकदारांना धनादेश देण्यात आले होते. परंतु, खात्यात रक्कम नसल्याने ते वटले गेले नाहीत, त्यामुळे गुंतवणूकदार कोर्टात पोहोचले आहेत.
डीएसकेचे पोस्टडेटेड चेक स्वीकारण्यास नकार
याबाबत गुंतवणूकदारांनी सांगितले, की डीएसकेमध्ये गुंतवणूक करण्यात आल्यानंतर त्यांनी काही धनादेश दिले होते. हे धनादेश वटण्यासाठी बँकेत जमा केले असता, खात्यात रक्कम नसल्याने ते परत आले आहेत. धनादेश अनादरीत झाल्याने गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला. याबाबत डीएसकेकडे तक्रार केली असता, त्यांनी दुसरे धनादेश घ्या म्हणून तगादा लावला. तथापि, हे धनादेश 24 सप्टेंबरनंतरच्या तारखेचे होते. गुंतवणूकदारांना तातडीने पैसे परत पाहिजे तर डीएसकेकडून त्यांना पुढील तारखेचे धनादेश देण्यात येत होते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी एकत्र येत दिवाणी प्रकरण कण्टोमेन्ट कोर्टात दाखल केले आहे. त्यानुसार, कोर्टाने डीएसकेसह एकूण सात जणांना समन्स बजावले असून, कोर्टासमोर हजर होण्यास सांगितले आहे.
पोलिसातील तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग
धनादेश अनादरप्रकरणी एकूण 13 गुंतवणूकदारांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात प्रकरण दाखल केले असून, त्यावरून या आठवड्यात समन्स जारी करण्यात आले आहे. धनादेश अनादरप्रकरणी कलम 141 व 138 अनुसार हे प्रकरण दाखल झाले असून, त्यात दोषी आढळल्यास किमान दोन वर्षाच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद या गुन्ह्यात आहे. तसेच, दंडदेखील ठोठावला जातो. अनादर झालेल्या धनादेशाच्या रकमेच्या दुप्पट एवढीही या दंडाची रक्कम असू शकते. कोर्टसूत्रानुसार, डी. एस. कुलकर्णी, त्यांच्या पत्नी व अन्य पाच संचालकांना हे समन्स जारी करण्यात आले आहे. ऑक्टोबरमध्ये या सर्वांना कोर्टासमोर हजर व्हायचे आहे. दरम्यान, गुंतवणूकदारांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात डीएसकेंविरोधात तक्रार दाखल केलेली असून, ही तक्रार पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे पुढील तपासासाठी पाठवली आहे. एकूण 173 गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल केल्या असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी दिली.