मुंबई : सध्या महाराष्ट्र पोलिसांची भरती प्रक्रिया सुरु असून, त्याअंतर्गत मुंबईत धावण्याची चाचणी पूर्व द्रुतगती मार्गावर सर्व्हिस रोडवर घेतली जात आहे. दरम्यान आज सकाळी 11 वाजता पोलीस भरती प्रक्रिया झाल्यावर विक्रोळी स्थानकाकडे जाताना 4 तरुणींना टाटा झेन गाडीने उडवले. यात या चारही तरुणी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना विक्रोळी येथील पालिकेच्या महात्मा फुले रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
काजल करडे, दीपाली काळे, चित्राली पांगे, चैताली दोर्गे अशी या तरुणींची नावं आहेत. पुण्याच्या शिरुरमध्ये असलेल्या शिरोळे अकादमीच्या या सर्व तरुणी आहेत. यातील दीपाली काळेला जास्त दुखापत असल्याने तिला सायनच्या टिळक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर वाहन चालकाला विक्रोळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस भरतीदरम्यान सकाळी याच ठिकाणी हिटस्ट्रोकमुळे दोन महिला उमेदवार देखील चक्कर येऊन पडल्या होत्या. त्यांना देखील महात्मा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.