महापुरुषांच्या विचारांमुळे जातीचा प्रादुर्भाव कमी- मंजुळे 

पिं चिं कल्चरल फौंडेशन तर्फे मंजुळेंना कलाविभूषण पुरस्कार प्रदान  

पिंपरी (प्रतिनिधी)  l गावपातळीवर जातीवरुन कसे हिणवतात हेच चित्र फॅंड्री मधून जब्या च्या माध्यमातून जनतेसमोर मांडले.जब्या काही अंशी माझ्यात ही आहे. जब्याचे जीवन मीही अनुभवलेत. मात्र महापुरुषांच्या विचारांमुळे जात नावाच्या विचित्र रोगाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहेत. असे उदगार

प्रसिद्ध दिग्दर्शक/ अभिनेते नागराज मंजुळे यांनी काढले.

पिंपरी चिंचवड कल्चरल फौंडेशन महाराष्ट्र च्या वतीने श्री मंजुळे यांना सांगवी येथील निळू फुले नाट्यगृहात कलाविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे यांनी श्री. मंजुळे यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते.

रोख रक्कम 51हजार रुपये ,सन्मान चिन्ह आणि शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावेळी आमदार आश्विनी जगताप, आमदार विलास लांडे,माजी नगरसेवक शतृघ्न काटे,नाना काटे, निर्मला कुटे,उद्योजक वसंत काटे,सतीश इंगळे,बापू पवार,उद्योजक संजय भिसे,जगन्नाथ काटे,सुरेश काटे,डॉ अमरसिंग निकम,लेखिका अनिता भिसे,कुंदा भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या कि, मंजुळे यांनी सैराट मधून पळून गेलेले प्रेम युगुलांमुळे घरातील झालेली घालमेल आणि ऑनर किलिंग चा प्रश्न मांडला.मागासवर्गीय जातीचा म्हणून ग्रामीण भागातून होणारा अपमान थांबला पाहिजेत.यावर सर्वांनी आवाज उठवला तर जातीचा ज्वलंत प्रश्न नष्ट होईल.

श्री लांडे म्हणाले कि, जाती व्यवस्थेवर भाष्य करणारे चित्रपट निर्मिती करून समाज प्रबोधन केले आहे.

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमे देणारे मंजुळे हे आमच्या साठी बहुजन समाजातील अमिताभ बच्चनच आहे.त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

प्रास्ताविक भाषणात विजय भिसे म्हणाले कि, शहराचा सर्व क्षेत्रात विकास झालेला आहे.मात्र शहरातील कला संस्कृतीचा अधिक विकास व्हावा या हेतूने सांस्कृतिक उपक्रम राबवत आहे. एक सांस्कृतिक अस्मिता जपण्यासाठी पिंपरी चिंचवड कल्चरल फौंडेशनच्या माध्यमातून काहीतरी करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

यावेळी भिसे यांच्यासह प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.संतोष घुले यांनी मंजुळे यांच्या परिचय पत्राचे वाचन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता जोगळेकर यांनी तर आभार शिल्पा बिदक्त यांनी मानले.

छ. शिवाजी महाराज हे सर्वांचे बाप… 

एका रसिकाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंजुळे म्हणाले कि, सर्व महापुरुषांनी सर्व जातीधर्मातील नागरीकांसाठी समाज परिवर्तन करण्याचे कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या सह अनेक महापुरुषांनी शिवाजी महाराजांना आपले गुरू मानले. शिवाजी महाराजांमुळे केवळ एका जातीचा उद्धार झाला नाही तर अठरापगड जातींसह संपूर्ण महाराष्ट्राचा उद्धार झाला. मराठी संस्कृतीचा विकास झाला. ते केवळ राजे नव्हते तर आपल्या सर्वांचे बाप होते…

संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच.जो काहीतरी करतो त्याला संघर्ष करावाच लागतो.म्हणून संघर्ष हा सकारात्मकते च्या दृष्टीकोनातून बघावे. संघर्षामुळे व्यक्ती तावून सुलाखून निघतो. त्यामुळे संघर्ष चांगलाच असतो.

अपयश आले म्हणून खचून न जाता चालत रहा. यश हे प्रबळ इच्छाशक्तीवर अवलंबून असते. इच्छाशक्तीमुळेच यशापर्यंत पोचता येते.त्यामुळे यशापेक्षा अपयश मोठे असते.माझ्या चित्रपटातील पात्र हे प्रेक्षकांना आपलेसे वाटते.त्यात प्रत्येकास आपले प्रतिबंध दिसते म्हणून ते माझ्यावर आणि माझ्या चित्रपटावर प्रेम करतात.अमिताभ बच्चन यांची वेशभूषा करून गावभर फिरायचो शाळेत कमी व्हिडिओ सेंटर मध्ये जास्त असायचो. मी दिग्दर्शक बनेल किंवा महानायक अमिताभ बच्चन साहेबांसोबत काम करेल असे मला कधीच वाटले नव्हते.