मुंबई: राज्याचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी पडसलगीकर हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना सहाय्य करतील. अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यांच्या मदतीसाठी सरकारने राष्ट्रीय उप-सल्लागारांची नियुक्ती केली आहे. अजित डोवाल हे आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे जेम्स बॉण्ड म्हणून परिचयाचे आहेत.
अजित डोवाल यांना आता राज्याचे माजी पोलीस महासंचालक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची मदत मिळणार आहे. देशाचे उप-सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच ते अंतर्गत सुरक्षा विभागाची जबाबदारी पार पाडतील. पडसलगीकर यांनी अगोदर आयबी मध्ये संचालकपदावरही आपली सेवा बजावली आहे. प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पडसलगीर हे परिचयाचे आहेत. दोन दशकांहून अधिक काळ पडसलगीकर यांनी गुप्तहेर खात्यात कर्तव्य बजावताना अनेक किचकट मोहिमा हाताळल्या. दहशतवाद, दहशतवादी संघटनांबाबत त्यांचा अभ्यास दांडगा आहे. अंतर्गत सुरक्षेसाठी उपाययोजना करताना त्यांच्यासारख्या अनुभवी, कर्तव्य कठोर, प्रामाणिक अधिकाऱ्याचा डोभाल यांना निश्चित फायदा होऊ शकेल. पडसलगीकर हे १९८२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण तपासात त्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती. त्यांनी मुंबई हल्ल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील धागेदोरेही शोधून काढले होते. याव्यतिरिक्त त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली आहे. पडसलगीकर यांनी अरूण गवळी टोळीचंही कंबरडं मोडलं होतं. याव्यतिरिक्त पोलीस उपायुक्तपदी कार्यरत असताना त्यांनी कामाठीपुऱ्यातील कुंटनखान्यातून त्यांनी ४५० अल्पवयीन मुलींची सुटका करून त्यांचं पुनर्वसनाचही मोठं काम केलं होतं. तर दुसरीकडे नागपुरमधील मटका आणि बेकायदेशीर दारूविक्रीविरोधात त्यांनी मोठी कारवाई केली होती. तर उस्मानाबादमध्ये सेवा बजावत असताना त्यांनी निजामाविरोधातील कारवाईत शहीद झालेल्या पोलिसांच्या पत्नींची माहिती मिळवून त्यांना पेन्शन सुरू करून दिलं होतं. त्यांच्या अनेक कामांची दखल घेत त्यांची राष्ट्रीय उप-सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.