जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभेत डीवायएसपी कृष्णांत पिंगळेंचे प्रतिपादन 

भुसावळ l

प्रतिनिधी श्री जय गणेश जेष्ठ नागरिक संघ सुरभी नगर भुसावळ ची साप्ताहिक सभा संघाध्यक्ष आर आर बावस्कर यांच्या अध्यक्षतेखाली श्री गणपती मंदिरात आयोजित करण्यात आली .प्रसंगी व्यासपीठावर भुसावळ विभागाचे पोलीस उपविभागीय अधीक्षक कृष्णात पिंगळे , जय गणेश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे व फाऊंडेशनचे गणेश फेगडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

प्रथम सत्रात वक्त्या डॉक्टर सुधा खराटे यांनी ज्येष्ठांनी शारीरिक व मानसिक आरोग्याची जपणूक नित्य व्यायाम व योगासने याद्वारे सोप्या पद्धती ने कशी करावी हे सोदाहरण स्पष्ट केले. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून व निसर्ग सानिध्यात जाऊन मानसिक संतुलन राखता येते असे काही उदाहरणाद्वारे स्पष्ट केले. सल्लागार दिनकर जावळे यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला.

यानंतर डी.वाय एस.पी. कृष्णात पिंगळे यांनी ज्येष्ठांशी सुसंवाद साधून उपयुक्त मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रामुख्याने त्यांनी पुढील बाबींचा उल्लेख केला ज्येष्ठांनी एकमेकांचे आधारवड बना, प्रचंड सकारात्मक व आशावादी राहावे, एकमेकांच्या नात्यांची वीण घट्ट करा, कष्टमय जीवनानंतर स्वच्छंदी पक्ष्यांप्रमाणे स्वतःसाठी जगा, आर्थिक व्यवहार करताना फसवेगिरी करणाऱ्या समाजकंटकांपासून सावधगिरी बाळगा .आर्थिक फसवेगिरी झाल्यास त्वरीत पोलीसांशी संपर्क साधा,कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास कोणत्याही वेळी संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपल्या समस्या सोडवा, ’पोलीस आपल्या दारी’ ह्या अभियानाच्या माध्यमातून मदतीसाठी संपर्कात रहा.

 

श्री जय गणेश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी डीवायएसपी साहेबांचे प्रेरणादायी व प्रचंड उत्साही व्यक्तिमत्व ज्येष्ठांसाठी खरोखरच ऊर्जा स्रोत आहे असे प्रतिपादन केले.

सभा अध्यक्ष तथा संघाचे अध्यक्ष आर आर पवार यांनी ज्येष्ठांनी शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी नियमितपणे योगासने व व्यायाम करावा व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मानसिक संतुलन कसे राखावे हे दोन कथांद्वारे प्रतिपादन केले. वाढती आयुर्मर्यादा लक्षात घेऊन नेहमी शरीराची व मनाची शुद्धता करावी असे सूचित केले.

नंतर सल्लागार प्रकाश विसपुते सरांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. पसायदान व राष्ट्रगीत होऊन कार्यक्रमाची सांगता झाली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी एम तिडके यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघ कोषाध्यक्ष शांताराम बोबडे आणि कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी व संघाचे सभासद यांनी सक्रिय सहभाग घेऊन सहकार्य केले.

नंतर कै हिरालाल साळी यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त त्यांचे सुपुत्र गणेश साळी यांनी सर्वांना सुरुची भोजनाचा आस्वाद दिला.

जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभेत बोलतांना पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे, सोबत माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, संघाचे अध्यक्ष आर.आर. बावस्कर,फाऊंडेशनचे समन्वयक गणेश फेगडे व पदाधिकारी.

ज्येष्ठांनी एकमेकांचे आधारवड बनावे