जळगाव- तालुक्यातील आसोदा येथे तरसोद रस्त्यालगत बंद सिनेमागृहाच्या बाजूला भितींच्या आडोश्याला सुरु असलेल्या सट्ट्याच्या अड्डयावर पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी सोमवारी छापा टाकला. यात कल्याण मटका जुगाराचे साहित्य साहित्यांसह 1 हजार 510 रुपये रोख व 6 हजाराचे तीन मोबाईल असा 7 हजार 510 रुपयांचा एैवज जप्त केला असून तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
आसोदा गावात कल्याण मटका नावाचा खेळ सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस नाईक अनिल पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण धमके, विजय काळे, रविंद्र मोतीराया पथकासह असोदा गाव गाठले. याठिकाणी शासकीय वाहन एकीकडे उभे करुन लपत छपत जावून सट्ट्याच्या अड्डयावर छापा टाकला. कारवाईत पोलिसांनी 7 हजार 510 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जयवंत महेंद्र जाधव वय 40, प्रविण भिका कोळी वय 37 व संजय अंकुश बिर्हाडे वय 46 तिघे रा. आसोदा यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी पोलीस नाईक अनिल पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे.